स्थैर्य, कोयनानगर, दि.१७ : येथे जलसंपदा विभागाच्या अनेक
वसाहती वापराविना मोडकळीस आल्या असून, त्या वसाहती गृह खात्याच्या ताब्यात
द्याव्यात, या “गृह’च्या मागणीला जलसंपदा विभागाने “हिरवा कंदील’ दाखवला
आहे. गृह विभाग तेथे प्रादेशिक पोलिस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्यासाठी पुढे
आले आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विकासाच्या व्याख्येतून
केंद्र उभे राहणार आहे.
कोयना धरण व जलविद्युत प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी गृह विभागाकडे आहे.
कोयनानगरच्या सात- बाऱ्यावरही जलसंपदा विभागाचा शिक्का आहे. कोयना धरण आणि
जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी असणारे कर्मचारी कोयना
प्रकल्पाच्या वसाहतीत राहतात. या वसाहतीत विविध प्रकारची 100 पेक्षा जादा
निवासस्थाने आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून या वसाहतीमधील अनेक
निवासस्थानांची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने निवासस्थाने वापराविना पडून
मोडकळीस आलेली आहेत. वसाहतीमधील 100 इमारतींपैकी 44 इमारतींमधील 138 खोल्या
नादुरुस्त असून, कोयना प्रकल्पाने त्या इमारती पाडण्याचा प्रस्ताव जलसंपदा
खात्याकडे मंजुरीसाठी दिला आहे. 62 निवासस्थाने नादुरुस्त असून, ती
दुरुस्त करून वापरात येऊ शकत असतील. मात्र, ती दुरुस्त करायची कोणी? कोयना
प्रकल्प निधीची चणचण असल्याचे कारण सांगून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
गृह विभागाने व वन्यजीव विभागाने कोयना प्रकल्पाकडील
मोडकळीस आलेल्या इमारती आपल्या विभागाला द्याव्यात, अशी लेखी मागणी केली
आहे. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी गृहराज्यमंत्री देसाई यांनीही कोयना
प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वसाहतीमधील निवासस्थाने गृह खात्याला
द्यावीत, अशी सूचना केलेली आहे. यामुळे यातील अनेक इमारती गृह विभागाला
मिळणार आहेत. श्री. देसाई यांच्या संकल्पनेतून या जागेवर गृह खाते पश्चिम
महाराष्ट्रातील प्रादेशिक पोलिस प्रशिक्षण केंद्र उभे करणार आहे. नुकताच
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयना दौरा झाला. या दौऱ्यात श्री.
देसाई यांनी श्री. ठाकरे यांना याबाबतची कल्पना दिली आहे. यापूर्वी आघाडी
सरकारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटील हे गृहमंत्री
असताना त्यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातील तुर्ची गावात पोलिस प्रशिक्षण
केंद्र उभारले आहे. हाच प्रयोग श्री. देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघात
करत आहेत. पोलिस प्रशिक्षण केंद्रात तीन हजार पोलिस प्रशिक्षण घेणार
असल्यामुळे कोयनेला गतवैभव प्राप्त होणार आहे.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर बहुउद्देशीय प्रकल्प…
दरम्यान, याबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देऊन दहा डिसेंबर
रोजी कोयना प्रकल्प व धरणाच्या पाहणी दौऱ्यावर मुख्यमंत्री आलेले असताना
त्यांना या प्रस्तावाबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी
याबाबतचा आराखडा तयार करून मंत्रिमंडळापुढे सादर करावा. मंत्रिमंडळाची
मंजुरी व निधीची तरतूद झाल्यावर लवकरच बहुउद्देशीय प्रकल्प कार्यान्वित
होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.