खंडाळा तालुक्यातील एका गावात पोलिसांनी बालविवाह रोखला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खंडाळा, दि.९: खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन युवतीचा होणारा विवाह सोहळा शिरवळ पोलीसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे रोखला गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, वाई तालुक्यातील १६ वर्षीय एका अल्पवयीन युवतीचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील एका २२ वर्षीय युवकाशी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गावात नातेवाईकांच्या घरासमोर गुरुवार दि.७ जानेवारी रोजी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार लग्न समारंभाची तयारी संबंधित ठिकाणी जोरदार करण्यात आली होती.
        यावेळी लग्न समारंभासाठी तयारी चालू असताना संबंधित लग्न समारंभातील नियोजित वधु हि अल्पवयीन असून तिचे वय अवघे १६ वर्षे असल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई व पोलीस हवालदार नितीन महांगरे ,महिला पोलीस हवालदार सुप्रिया जगदाळे यांना याबाबतच्या सूचना देत तातडीने लग्नसमारंभ ठिकाणी जाण्यास सांगितले .
      यावेळी लग्नसमारंभ ठिकाणी वधु व वर यांच्यावर अक्षदा पडण्याची वेळ जवळ आली असताना शिरवळ पोलीसांनी मंडपात दाखल होत संबधित वधूची चौकशी करीत वयाचा पूरावा पाहिला असता संबंधित वधू हि अवघे १६ वर्षाची अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई व शिरवळ पोलीसांनी दोन्हीकडील नातेवाईकांचे समुपदेशन केल्यानंतर विवाह समारंभ हा युवतीचे वय कायद्याप्रमाणे पूर्ण झाल्यानंतर करण्याचे नातेवाईकांनी कबूल केले.
      यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूकडील नातेवाईकांनी गर्दी केल्याने शिरवळ पोलीस स्टेशन आवारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिरवळ पोलीसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर नातेवाईकांनी सुस्कारा सोडला.
    शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे ,पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई व शिरवळ पोलीसांनी सतर्कता दाखविल्याने एका १६ वर्षीय अल्पवयीन युवतीचा विवाह सोहळा रोखला गेल्याने विविध स्तरातून शिरवळ पोलीसांचे कौतुक होत आहे.

Back to top button
Don`t copy text!