फलटण व कोरेगाव तालुक्यातील अफूच्या शेतीवर पोलिसांचा छापा; २२,८३,४०० रूपये किमतीची अफूची झाडे जप्त

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपी ताब्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ मार्च २०२४ | सातारा |
सासवड (झणझणे), ता. फलटण गावच्या हद्दीत व देऊर (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीतील अफू या अंमली पदार्थाच्या झाडांच्या शेतीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून २२,८३,४०० रूपये किमतीची ११४.१७४ कि.ग्रॅ. अफूची झाडे जप्त केली.

या प्रकरणी दीपक आबा झणझणे (वय ४५, रा. सासवड (झणझणे), ता. फलटण, जि. सातारा) व मधुकर शिवाजी कदम (वय ५७, रा. देऊर, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अंमली पदार्थ लागवड, वाहतूक करणार्‍या इसमांविरूध्द कारवाई करण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहा. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व सहा. पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांची दोन पथके तयार करून त्यांना सातारा जिल्ह्यातील अंमली पदार्थ अफू झाडे लागवड करणार्‍या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, दि. ४ मार्च २०२४ रोजी पोनि अरुण देवकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सासवड (झणझणे), ता. फलटण येथील दीपक आबा झणझणे या इसमाने पट्टीचा मळा नावच्या शेतात तसेच देऊर (ता. कोरेगाव) येथील मधुकर शिवाजी कदम याने जातेखण नावच्या शिवारातील शेतामध्ये अफू या अंमली पदार्थाच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. त्याप्रमाणे सपोनि सुधीर पाटील व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने देऊर येथे छापा टाकून मधुकर कदम या आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्या शेतातून ४,६६,९०० रूपये किमतीची २३.३४५ कि.ग्रॅ. अफूची झाडे हस्तगत करून त्याच्या विरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

दुसर्‍या कारवाईत सपोनि रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने सासवड (झणझणे), ता. फलटण येथे छापा टाकून लोणंद पोलीस ठाण्यातील सपोनि सुशील भोसले व अंमलदार यांच्या मदतीने दीपक आबा झणझणे यास ताब्यात घेऊन त्याच्या शेतातून १८,१६,५८० रुपये किमतीची ९०.८२९ कि.ग्रॅ. अंमली पदार्थ असणारी अफूची झाडे हस्तगत करून त्याच्याविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

या दोन्ही कारवाईत एकूण २२,८३,४०० रुपये किमतीची ११४.१७४ कि.ग्रॅ. वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून गांजा, गांजाची झाडे व अफूची झाडे असे एकूण ११ वेगवेगळ्या कारवाया करून १,८७,७७,५८०/- रुपये किमतीचा ७७५.२६० किलो ग्रॅम वजनाचा गांजा, गांजा झाडे व अफू झाडे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, विशाल कदम, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बोबले, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, मुनीर मुल्ला, प्रवीण फडतरे, अमाले माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील आदी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.


Back to top button
Don`t copy text!