दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील सर्व ३५ रिक्त पोलिस पाटील पदांसाठी गुरुवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार फलटण यांचे दालनात आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील पोलिस पाटील रिक्त पदांची भरती प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व उपविभागीय स्तरावर एकाच वेळी करण्यात येणार असून संपूर्ण जिल्ह्यात दि. १७ रोजी आरक्षण सोडत, दि. २२ रोजी पोलिस पाटील भरती बाबत जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून दि. ४ मार्च पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येतील, इच्छुक उमेदवारांच्या लेखी परीक्षा दि. १३ मार्च, तोंडी परीक्षा दि. २२ मार्च रोजी घेण्यात येणार असून दि. २८ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
गुरुवार दि. १७ रोजी पोलीस पाटील सरळसेवा भरतीकामी १०० बिंदू नामावली व प्रवर्ग निहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने येणाऱ्या आरक्षणातून ३० % जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सांगितले आहे.
फलटण तालुक्यात कोपर्डे, धुळदेव, झडकबाईचीवाडी, तरडफ, सोनगांव, मानेवाडी, पाडेगांव, शिंदेमाळ, रावडी खु||, काशिदवाडी, खामगांव, होळ, खुंटे, ढवळेवाडी (आसू), कुरवली खु||, ठाकूरकी, सासकल, अलगुडेवाडी,भाडळी बु||, वडगांव, कोळकी, कोऱ्हाळे, चांभारवाडी, फडतरवाडी, पवारवाडी, खटकेवस्ती, फरांदवाडी, कापशी, दालवडी, निंभोरे, गुणवरे, ढवळ, विडणी, तावडी, जाधववाडी (फ) आदी ३५ गावात पोलिस पाटील पदे रिक्त असल्याने या भरती प्रक्रियेद्वारे तेथील रिक्त पदांसाठी लेखी व तोंडी परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी सांगितले.