सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर,दि.११: कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सिद्धेश्वर मंदिर परिसरात आज मध्यरात्री (दि. 12 जानेवारी )  12 वाजल्यापासून ते 17 जानेवारी 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक)- मंगळवेढेकर इन्स्टिटयुट कॉर्नर- हरिभाई देवकरण प्रशाला समोरील रस्ता- स्ट्रीट रोड- सिद्धेश्वर कन्या प्रशाला समोरील रस्ता-वनश्री नर्सरी विष्णू घाट- गणपती घाट- सरस्वती कन्या प्रशाला- भूईकोट किल्ल्याचा आतील परिसर- चार पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक)  अशा ठिकाणांसह आतील सर्व परिसरात संचारबंदी आदेश लागू राहील. परिसरातील रहिवाशांना संबंधित पोलीस ठाण्याकडून प्रवेशासंबंधात रहिवाशी पुराव्यासह पास प्राप्त करुन घ्यावे लागतील. इतर बाहेरील व्यक्तींना परिसरात प्रवेशास मनाई असेल. मंदिर परिसर भागात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या शासकीय वाहनास प्रवेश राहिल. शासनाच्या वतीने सेवा बजावणाऱ्या व्यक्तींनी  स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवावे. दर्शनासाठी, यात्रेसाठी भाविकांना प्रवेशास व मंदिर परिसरात येण्यास मनाई असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

होम मैदानामध्ये मॉर्निंग वॉक, मैदानी खेळ, सराव, सेल्फी पॉइंटसाठी मैदान बंद राहिल. मंदिर परिसरात अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना वगळून इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद राहतील. धार्मिक विधीच्या ने-आणसाठी मर्यादित वाहनांनी संबंधित पोलीस ठाण्याकडून पास प्राप्त करुन घ्यावा. मनोरंजन, करमणुक, खाद्यापदार्थ पुजा साहित्य विक्रीच्या दुकानास परवानगी नसल्याने दुकानदारांना प्रवेशास बंदी असेल. प्रतिबंधित क्षेत्रात आतिशबाजी, दारुकामांना मनाई असेल.  शहर, जिल्हा, इतर राज्याबाहेरील भाविकांना यात्रेस मनाई राहिल.  मंदिर परिसरात यात्रा कालावधीमध्ये परवानगी शिवाय इतर ठिकाणी नंदीध्वज, पालखी, वाद्यपथक यांच्या मिरवणुकीस मनाई असेल.  मंदिरातील दैनंदिन पूजा, धार्मिक विधी  करणाऱ्या पुजाऱ्यांना मर्यादित संख्येमध्ये पोलीस ठाण्याकडून पास घेवून प्रवेशास परवानगी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वरील बाबीचे  उल्लघंन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता 45 ऑफ 1860 कलम, 188,269,270 व इतर कायद्यामधील तरतुदीनुसार कायदेशीर/दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!