रामभक्तांवर पोलिसांची कारवाई, राज्यात मोगलाई अवतरली – केशव उपाध्ये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई,दि. ०६ : अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडविले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी मुंबईत केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

उपाध्ये म्हणाले की, कोरोना महामारीच्या प्रसाराच्या काळात सर्व नियम, बंधने पाळूनच हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. असे असताना पोलीस यंत्रणेने काही ठिकाणी दबाव तंत्राचा वापर होऊन आनंदोत्सव होणारच नाही यासाठी प्रयत्न केले. पिंपरी- चिंचवड मध्ये कार्यकर्त्यांनी 10 लाख  लाडूचे वाटप करण्याचे ठरविले होते. मात्र पोलिसांनी लाडू वाटप करण्यास प्रतिबंध केला. अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमा आणि झेंडे जप्त केले. इंदापूर, बारामती, सासवड येथे कार्यक्रम होऊच दिले नाहीत.

विदर्भात अमरावती, बडनेरा, परतवाडा, पुसद, अकोला येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले. ‘कार्यक्रम केला तर बघा, गुन्हे दाखल करू’, अशी भाषा पोलिसांकडून वापरली गेली. नागपूर येथे बॅनर, झेंडे लावू दिले नाहीत.

नाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात अंतर राखण्याचे सर्व नियम पाळून आनंदोत्सव साजरा करण्याची विनंती पोलिसांनी फेटाळून लावली. काळाराम मंदिर परिसरात सर्वत्र बॅरिकेड्स लावले गेले. अखेर आ.देवयानी फरांदे यांनी बंदी हुकूम मोडून रामकुंडावर आरती केली. परभणी येथे पेढे वाटप कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मालेगाव येथे झेंडेही लावू दिले नाहीत. परळी येथे आनंदोत्सव साजरा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. सिन्नर येथे आरती केल्याबद्दल शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना 3 तास पोलीस स्थानकात स्थानबद्ध केले गेले. अनेक ठिकाणी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली गेली.

कराड येथे महिला कार्यकर्त्यांना कार्यक्रम करू दिला नाही. अकलूज येथेही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून दमदाटी केली गेली. झेंडे, पताका लावण्यास प्रतिबंध केला गेला. हे प्रकार पाहिल्यावर आनंदोत्सव साजरा होऊ द्यायचाच नाही, असा सरकारचा छुपा अजेंडा होता, अशी शंका येते, असे उपाध्ये यांनी नमूद केले.        

उपाध्ये यांनी सांगितले की, नगर जिल्ह्यात पोलिसांनी कहर करून कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, शेवगाव या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. काँग्रेसबरोबर आघाडी केली म्हणून हिंदुत्व सोडले नाही असे सांगणाऱ्या शिवसेनेचे खरे स्वरूप या निमित्ताने दिसून आले. सत्तेसाठी सेनेने रामराज्याचा मार्ग सोडला आणि मोगलाई स्वीकारली हेच या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा भूमीपूजन सोहळा होत असताना संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा झाला. हा ऐतिहासिक दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. कोरोनाचे भान ठेवून कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी अनेक ठिकाणी रामभक्तांवर कारवाई करून आघाडी सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचे दाखवून दिले, असेही श्री. उपाध्ये यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!