दैनिक स्थैर्य | दि. २० डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गोखळी येथील प्रसिद्ध गझलकार, शाहीर, कवी प्रमोद सुनील जगताप यांना नवी दिल्लीत होणार्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘कवी कट्टा’ या कार्यक्रमात ‘गझल’ सादर करण्याची संधी मिळणार आहे. हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे.
कवी प्रमोद सुनील जगताप गोखळी, ता. फलटण, जि. सातारा येथील ग्रामीण भागातील कवी असून सध्या केंद्रीय अनु. जाती निवासी आश्रमशाळा, पळशी, ता. माण येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित असणारे कवी प्रमोद जगताप हे सध्या कवितेचं गावं जकातवाडी-फलटण तालुकाध्यक्ष आणि काव्यफुले मराठी साहित्य व कला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिवपद भूषवून साहित्य सेवा करीत आहेत. गोखळी येथे कवी प्रमोद जगताप यांच्या माध्यमातून नुकतेच ग्रामीण कवीसंमेलन झाले. त्यांच्या दिल्ली साहित्य वारीसाठी विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.