दैनिक स्थैर्य । दि. १३ मे २०२३ । नवी दिल्ली । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर शमली. कर्नाटकच्या मतदारांनी आपली ५-५ वर्षांनी सत्तापालटाची परंपरा कायम ठेवली आणि यावेळी सत्ताधारी भाजपाला पायउतार करून काँग्रेसला बहुमत दिले. काँग्रेसकडून या निवडणुकीत बरीच ताकद लावण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. इतकेच नव्हेतर काँग्रेसला भाजपापेक्षा दुपटीपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळेच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा उदो उदो केला जात आहे. त्यासोबतच मोदी-शाह जोडीचा हा पराभव असल्याचा सूरही एका गटाकडून दिसून येत आहे. तशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र काँग्रेसचे विजयासाठी खुलेपणाने अभिनंदन केले आहे.
“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू,” असे ट्विट करत मोदींनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.