
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ मार्च रोजी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे. या अनुषंगाने ‘पीएम किसान उत्सव दिवस’ साजरा करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १२ मार्च : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील २२ वा हप्ता देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी जमा होणार आहे. आसाममधील गुवाहाटी येथील ज्योती बिश्नु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा येथून सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या निधीचे थेट वितरण केले जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण वितरणाच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. १३ मार्च हा दिवस संपूर्ण जिल्ह्यात ‘पीएम किसान उत्सव दिवस’ (PM KISAN Utsav Divas) म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यामध्ये तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, थेट प्रक्षेपणाद्वारे शेतकऱ्यांना या सोहळ्यात सहभागी होता येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी आणि शेतकरी बांधवांनी शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या ‘पीएम किसान उत्सव दिवस’ कार्यक्रमांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे महत्त्वपूर्ण आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

