स्थैर्य, दहिवडी, दि. २३ : दुष्काळी माणमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे जवळपास तलावात कमी-अधिक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे तर जून व जुलै महिन्यामध्येही चांगला पाऊस झाल्याने माणमध्ये खरीप हंगाम बहरला आहे. परंतु जादा पावसामुळे सध्या शेतकरी शेतातील तणही काढू शकत नसल्याने वैतागले आहेत. एकूणच दमदार पावसाने यंदा दुष्काळाचे सावट हटले आहे. बर्याच वर्षानंतर पावसाने प्रथमच माणमध्ये दमदार हजेरी लावली अन निसर्गाने हिरवा शालू नेसला असल्याचं सुखद चित्र सर्वत्र दिसत आहे.
दरवर्षी पाणीसाठ्यात खडखडाट असणार्या माणमध्ये अद्यापही अपवाद वगळता पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. जलसंधारणाच्या कामाबरोबरच गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाचा परिणाम दिसत आहे. यंदाच्या पावसाने माण पुन्हा पाणीदार होण्याचे स्वप्न साकारण्याची शक्यता आहे. परिणामी सध्या तरी दुष्काळी कलंक काहीसा पुसला गेल्याने माणवासीय सुखावला आहे. माण तालुक्यात पुरेशा पावसाअभावी माळरान, आटलेले पाणीसाठे, करपलेली शेती व पोटासाठी भटकंती असेच चित्र अनेक वर्षांपासून पाहायला मिळत होते. ही परिस्थिती बदलण्याची धडपड कायम सुरू होती. तरीही जिद्द कायम ठेवून एका मागून एक गावाने जलसंधारणासाठी घट्ट पाय रोवून श्रमदानाने सुरुवात केली. गेल्या 2-4 वर्षात यासाठी जणू लढाच उभा राहिला व पडणार्या पावसाला जमिनीत थांबविण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. पाण्यासाठी गावे स्वयंपूर्ण होत असतानाच माणच्या काही भागात उरमोडी योजनेचे पाणीही शिवारात खेळू लागले. गेल्या 2 वर्षांपूर्वी पावसाअभावी पडलेल्या दुष्काळाने माणसं होरपळून निघाली खरी, परंतु गेल्या वर्षी सरासरीपेक्षा दीड पट पावसाने सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले. आधीच उरमोडीचे पाणी पोचलेले काही पाणीसाठे या पावसाने भरून वाहिले.
यंदा मात्र अगदी पावसाळ्याच्या तोंडावर अपवाद वगळता दुष्काळ जाणवलाच नाही. सध्या लोधवडे, गंगोती, मासाळवाडी, महाबळेश्वरवाडी हे 4 तलाव वगळता सर्वच पाणीसाठ्यात मिळून साधारणत: 12.17 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा पडणार्या पावसाने तालुक्यातील सर्वच पाणीसाठे पुन्हा ‘फुल्ल’ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी यंदाचे वर्ष कोरोनाच्या विळख्यात असले तरी पाण्याच्या बाबतीत मात्र काहीसे सुखावह असल्याने माणवासीयांची वाटचाल दुष्काळमुक्तीच्या दिशेने होत असल्याचे चित्र आहे.
यावर्षी पाऊस बर्यापैकी झाल्याने शेतकर्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. 44 हजार 750 हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून त्यापैकी 44 हजार 133 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी 99 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 464 मि. मी. असून त्यापैकी 201 मिलीमीटर पाऊस जून व जुलैमध्ये पडला आहे. दरवर्षी पडणार्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस खूपच झाला आहे. शेतात तणाचा ऊत आला असून ते काढण्यासाठी शेतकरी पाऊस थांबायची वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिनाअखेर तालुक्यात सर्वच तलावात पाणी नव्हते परंतु यावर्षी परिस्थिती चांगली आहे.