खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर यश मिळवावे : श्रीमंत संजीवराजे

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेचे फलटणमध्ये उद्घाटन


स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : “फलटणला संस्थान काळापासून खेळाला प्रोत्साहन देण्याची परंपरा आहे. या भूमीने अनेक खेळाडू घडवले आहेत. आजच्या खेळाडूंनीही जिद्द, मेहनत आणि शिस्त या त्रिसूत्रीच्या बळावर खेळात आपले स्थान निर्माण करावे आणि मेजर ध्यानचंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा,” असे मत महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथे शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुधोजी हायस्कूल, दि हॉकी सातारा आणि तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सुप्रिया गाढवे यांनी, “या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील हॉकीपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत असून, जिल्ह्यातील हॉकी खेळाला निश्चितच बळ मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी क्रीडा अधिकारी श्री. महेश कुटाळे, ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री. जगन्नाथ धुमाळ, श्री. बी. बी. खुरुंगे, क्रीडा समिती सदस्य श्री. शिवाजीराव घोरपडे, श्री. वसंत शेडगे, श्री. महेंद्र जाधव, श्री. समर अहिवळे, श्री. गणेश भोईटे, श्री. कपिल मोरे आणि क्रीडा शिक्षक श्री. सचिन धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!