दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२४ | बारामती |
सातत्य व आत्मविश्वास या जोरावर आपण खेळामध्ये यश मिळवू शकता व आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकता, असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे यांनी केले.
बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ व गुणवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते (कबड्डी) अशोक शिंदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रो कबड्डी सीजन १० विजेते ‘पुणेरी पलटण’ संघाचा कर्णधार अस्लम इनामदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होता, तर बारामती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सतपाल गावडे, शंभू भोपळे, वसीम इनामदार, राष्ट्रीय खेळाडू मंगेश मुरकुटे, बारामती स्पोर्ट्सचे सदस्य दत्ता चव्हाण, खजिनदार बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मोहन कचरे, स्ट्रेंन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक शिवाय पायघान, प्रो कबड्डी खेळाडू बंगाल वॉरियर्स दीपक शिंदे, प्रो कबड्डी खेळाडू बंगाल वॉरियर्स श्रेयश उमरदंड, बारामती स्पोर्ट्सचा खेळाडू ऋषिकेश बनकर, ओंकार गाडे, ओंकार लाळगे, ओंकार शिंदे, साक्षी काळे, ऐश्वर्या झाडबुके व प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते.
यश मिळवण्यासाठी सराव तर कराच; परंतु यश मिळवल्यावर टिकवण्यासाठी सुद्धा सराव आवश्यक आहे. दिखाऊ न राहता टिकाऊ रहा, असा सल्ला अस्लम इनामदार यांनी यावेळी खेळाडूंना दिला.
ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे मैदान प्राप्त व्हावे व योग्य मार्गदर्शन मिळावे, कबड्डी खेळाचा प्रसार व प्रचार होऊन त्यामधून गुणवंत खेळाडू निर्माण होण्यासाठी बारामती स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केली असून २०१७ पासून गुणवंत व प्रतिभावंत खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर तयार झाले आहेत, हे खास वैशिष्ट्य असून दरवर्षी हा उपक्रम जिल्हा क्रीडा संकुल येथे होत असतो. नवीन विद्यार्थी व खेळाडूंनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन बारामती स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रो कबड्डी खेळाडू व एन. आय. एस. कोच दादासो आवाड यांनी सांगितले.
यावेळी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अजिनाथ खाडे यांनी आभार मानले.