तारांगणाचे निमित्त …ज्ञान, विज्ञानाची झेप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२२ । मुंबई । वैज्ञानिक पैलू असण्याची गरज राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. मुळात मनुष्य प्राणी स्वभावत: कौतूहल असणारा प्राणी आहे आणि याच कुतूहलातून तो निरानराळे प्रयोग करीत आला आणि याच प्रयोगातून निरनिराळे शोध लागले. प्रगत तंत्र विकसित होत आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पोहोचलो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहत असताना नवीन पिढीमध्ये संशोधन वृत्ती तयार व्हावी, यास्तव सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’ हा त्यातीलच एक प्रयत्न आहे.


मी स्थानिक आमदार झाल्यानंतर तारांगणाची संकल्पना प्रथम मांडली व त्याचा पाठपुरावा सुरु झाला. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यातून ही वास्तू आज साकारली आहे. यात केवळ तारांगणाचा प्रकल्प ११ कोटी ५८ लाख रुपयांचा आहे. यातील स्थापत्य कामाची किंमत ५ कोटी ६८ लाख एवढी आहे तर प्रत्यक्षात तारांगणासाठी लागणारी अद्ययावत प्रक्षेपण यंत्रणा ३ डी प्रक्षेपण साहित्य आणि सुसज्ज असे वातानुकूलीत थिएटर यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. जगात सर्वोत्तम अशी तारांगण निर्मिती यामुळे शक्य झाली आहे. या ठिकाणी कार्यक्रम सादरीकरणासाठी खुल्या व्यासपीठाचीही उभारणी स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.

येणाऱ्या विद्यार्थी व पर्यटकांना पहिला प्रक्षेपण कालावधी संपेपर्यंत फिरण्याची व्यवस्था आहे. दुसऱ्या टप्प्यात या तारांगणालगत ८० लाख ७६ हजार रुपये खर्च करुन येथे कलादालन (आर्टगॅलरी) उभारण्यात आले आहे. स्थानिकांची गुणवत्ता यामुळे जगासमोर येण्यास मदत होईल. सोबतच विज्ञान गॅलरी या ठिकाणी विकसित होत आहे. त्यावर १ कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये खर्च होणार आहेत.

सर्वांना एकाच ठिकाणी कला व विज्ञान यांचा संगम या वास्तूत आगामी काळात बघायला मिळेल. या दृष्टीकोनातून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करीत असताना नियोजन करुन ते कार्य साकारण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि येत्या पिढ्यांना एक मोलाचा साठा तयार करुन दिला आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’ या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभहस्ते होणार आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

कुतूहलाला मर्यादा नाही त्यामुळे संशोधनाचे क्षेत्र देखील त्याच पद्धतीने अमर्याद असे आहे. मराठीन म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. कल्पनाशक्तीवर असंख्य बाबी अवलंबून असतात याच धर्तीवर आणखी पुढचा टप्पा म्हणजे अवकाश संशोधन अर्थात खगोल विज्ञान. कधी काळी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानले जात होते. ही धारणा संशोधनातून रद्दबातल ठरली आणि हळू हळू विश्वाचा पसारा किती अवाढव्य आहे याचा खुलासा आपणास व्हायला लागला. अवकाश अमर्याद आहे आणि त्यात संशोधन देखील.
हॉलंडमध्ये १६०८ साली टेलीस्कोपचा शोध लागला. त्यात आवश्यक त्या सुधारणा करून १६११ साली गॅलिलियो ने त्याचा वापर अवकाशात डोकावण्यासाठी केला. त्यानंतर गेला ४०० वर्षांहून अधिकच्या प्रवासात’ विविध प्रकारे अवकाशाचा वेध आपण घेत आहोत.
नोबेल पदक मिळविणारे शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचा या विश्वाचा धांडोळा घेण्यात मोलाचा वाटा आहे. ज्यांनी शोधलेला स्पेक्ट्रोग्राफीक किरणांच्या आधारे विश्वाच्या नवनव्या अंतरांचा वेध घेण्यात येतो. त्याचप्रमाणे रेडिओ लहरी, एक्स-रे अर्थात क्ष किरणे, इन्फ्रारेड तसेच अल्ट्रा व्हायोलेट किरणांची देखील यात मदत होते.

पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन उपग्रहांच्या माध्यमांमधून वेध घेण्यासोबत अवकाशात उभारण्यात ‘हवल’ टेलिस्कोप अर्थात अंतराळ दुर्बीणीने विश्वाचे अंतरंग किती विस्तीर्ण आणि विराट आहे. याचे स्वरूप आपल्याला कळायला लागले. २५ डिसेंबर २०२१ रोजी अंतराळात पाठविण्यात आलेली अंतराळ दुर्बीण जेम्स वेब कार्यान्वित झाल्याने या संशोधनास आता अधिक गती प्राप्त झाली. हा या मालिकेतील सर्वात ताजा अध्याय म्हणता येईल.

आपल्या आयुष्यात देखील कुतूहलाचा हा भाग असतो आणि पुराणकाळापासून याचे दाखले देखील आपणास सापडतील. पृथ्वीच्या सर्वच ठिकाणी प्रत्येकाच्या मनान कुतूहल असले तरी समुद्र किनाऱ्यावरील जीवनात याला अधिक महत्वाचे स्थान आहे. सागरी जीवन पूर्णपणे त्यावर अवलंबून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सागरास येणारी भरती आहोटी आणि आकाशातील त्या चंद्रकलांमुळे घडणारे बदल यात अमावस्या आणि पौर्णिमा या भोवती सागरी व सागर किनाऱ्यावरील जीवन अधिक अवलंबून असते.

अंतराळाचा वेध घ्यावा याची आवड अनेकांना आहे. याची तोंड ओळख रत्नागिरी सारख्या ठिकाणी झालेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या माध्यमातून सर्वांना होणार आहे. अतिशय अद्ययावत आणि त्रिमीती (3D) तारांगण असणाऱ्या या वास्तूच्या रुपाने नव्या पिढीतील कुतुहलाची उत्तरे मिळू शकतील आणि यातून या भूमीतून या क्षेत्रात संशोधन करण्यास अनेकजण पुढे येतील.
विज्ञान हे प्रगतीचे साधन आहे आणि संशोधन हा प्रगतीचा मार्ग आहे. भारतात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने यात अतुलनीय कामगिरी केली आहे. ज्या आधारे आपण चांद्रयान व मंगळयान सारख्या मोहिमा आखल्या. मंगळावर आपला उपग्रह पोहोचला. याला नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे.

रत्नागिरी येथे इन्फोव्हीजन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. ने या सुसज्ज तारांगणाच्या उभारणीत महत्वाचा वाटा उचलला आहे. भारतात आजवर ५० हून अधिक तारांगणे उभारण्यात आली आहेत. देशातील पहिले डिजिटल तारांगण मुंबईत नेहरु तारांगण ठरले. तर देशातील पहिले डिजिटल ३D स्वामी विवेकानंद तारांगण आहे हे मंगलोर येथे आहे. रत्नागिरीत आकारास आलेले ३-D तारांगण देशातील या स्वरुपाचे पाचवे तारांगण आहे.

आपण चांद्रयान पाठविणाऱ्या प्रगतशील देशातील नागरिक असून संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी अशा तारांगणाची गरज आहे. ही गरज या तारांगणाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. पुढच्या पिढीसाठी अशा स्वरुपाच्या वास्तू प्रेरणादायी राहणार असून हा रत्नागिरीच्या पर्यटन आणि शिक्षण मार्गावरील मैलाचा दगड ठरणार आहे.

– उदय सामंत,
उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य


Back to top button
Don`t copy text!