
सातारा – विनोद कुलकर्णी यांच्याकडे निधी देताना पालवी शिराळकर समवेत मान्यवर.
स्थैर्य, सातारा, दि. 20 सप्टेंबर : सातार्यात तब्बल 32 वर्षानंतर होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्सकुता बालगोपाळांपासून अबालवृध्दांना आहे. हे संमेलन आता 1 ते 4 जानेवारी 2025 रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उत्सुकता आणखी वाढली आहे. संमेलनात सर्वांचा सहभाग असावा यासाठी मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या आयोजक संस्थांनी इच्छाशक्तीनुसार देणगी देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक दानशूरांनी निधी देण्यास सुरुवात केली आहे. संमेलनाच्या उत्सुकतेपोटी आणि निधी देण्याच्या आवाहनाचे वृत्त वाचून शाहूनगर येथील पालवी प्रशांत शिराळकर हिने वाढदिवसानिमित्त पिगी बँकेतील जमा झालेला 2999 रुपये निधी साहित्य संमेलनासाठी दिला. तिच्या या निर्णयाचे मान्यवरांनी कौतुक केले.
सातार्यात लवकरच 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे.
तब्बल 12 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर हे संमेलन सातार्याला मिळाले असून स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. संमेलनासाठी येणारा खर्च मोठा असल्याने संयोजकांनी 99 रुपयांपासून ते इच्छाशक्तीनुसार देणगी देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सातार्यातील विविध संस्था, मान्यवर, दानशूर व्यक्ती, ज्येष्ठ, शाळा, शाळेतील विद्यार्थी यांनी देणगी देण्यास सुरुवात केली आहे.
प्रसिध्दीमाध्यमे आणि सोशल मिडियावर संमेलनाबाबत होत असलेल्या चर्चांमुळे शाहूनगर येथील यशोदाच्या साधना इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिकणारी पालवी शिराळकर हिला याबाबत उत्सुकता निर्माण झाली. तसेच देणगी देण्याबाबतचे आवाहन आणि देणगी दिल्याबाबतचे वृत्त वाचण्यात आल्यानंतर तिने पिगी बँकेतील जमा झालेला निधी देण्याचे ठरवले.
पालवी दरवर्षी वाढदिवसानिमित्त पिगी बँक फोडून त्यात जमा झालेल्या निधीतून उपयोगी वस्तू घेते परंतु यावर्षी तिने हा निधी साहित्य संमेलनासाठी देणगी देण्याचे म्हणून ठरवले. त्यानुसार तिने वडील प्रशांत शिराळकर यांना याबाबत सांगितले. तिचा हा निश्चय पाहून वडिलांनी सुध्दा त्यांच्याकडील काही पैसे त्यात भर घालून आपण देणगी देऊ असे सांगितले. पिगी बँकेतील पैसे आणि वडिलांकडे पैसे असे एकूण 2999 रुपयांचा निधी पालवीने साहित्य संमेलनासाठी देणगी म्हणून दिला. ही देणगी तिने 99 व्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याकडे वाढदिवसादिवशी सूपूर्द केला. यावेळी 99 व्या साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, प्रेरणा शिराळकर, वजीर नदाफ, सचिन सावंत, तूषार महामूलकर, संजय माने, उपस्थित होते. पालवीच्या या निर्णयाचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.