दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२२ । फलटण । येथील जुन्या पिढीतील वृत्तपत्र विक्रेते स्व. भ. मा. गोसावी यांचा पणतू आणि स्व. अविनाश भगवान गोसावी यांचा नातू आणि मंगेश गोसावी यांचा सुपुत्र चि. अनिश मंगेश गोसावी, फलटण हल्ली राहणार पुणे याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 68 वा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानुसार या समारंभात सुमी सिनेमातील आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या बालकांना तर टकटक या सिनेमासाठी अनिष मंगेश गोसावी यांना रजत कमळ प्रदान करण्यात आले.
दरम्यान, याच समारंभात गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार तर प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.