दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | फलटण | प्रसन्न रुद्रभटे | फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व सद्गुरू उद्योग समुहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांनी गृहनिर्माण मतदारसंघातुन जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आगामी काळामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवणार ? की निवडणुकीतून माघार घेणार याकडे आता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व्हावे, ही इच्छा जिल्ह्यातील बऱ्याच मातब्बर नेत्यांमध्ये असते. परंतु सगळ्यांनाच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी काम करण्याची संधी मिळतेच असे नाही. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे ज्या मतदारसंघातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक लढवित आहेत, त्याच मतदारसंघांमधून फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व सद्गुरु उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये दिलीपसिंह भोसले हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवणार की आपला अर्ज माघारी घेणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागल्यानंतर सातारा जिल्ह्यामधील बऱ्याच नेत्यांनी आपल्याला संचालकपदी काम करण्याची संधी मिळावी यासाठी आपापल्या मतदारसंघांमधून व इतर मतदारसंघांमधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेल करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या गोटामध्ये चालू आहेत. त्यासोबतच भारतीय जनता पार्टी सुद्धा आपले पॅनल टाकून निवडणूक लढवण्याच्या पवित्र्यामध्ये आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व सद्गुरु उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आहे.
विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार आपण गृहनिर्माण मतदारसंघांमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आमचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जो आदेश देतील तो आदेश शेवट मानुनच आगामी काळामध्ये आपण कार्यरत राहणार आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जर आदेश दिला तर आपण पूर्ण ताकदीनिशी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवणार आहे, असे मत फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व सद्गुरू उद्योगसमूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांनी दैनिक स्थैर्यशी बोलताना व्यक्त केले.