दैनिक स्थैर्य | दि. 15 सप्टेंबर 2024 | फलटण | विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वस्तुनिष्ठ वृत्तांकन करीत असलेले स्थैर्य माध्यम समुह फलटण तालुक्यात अव्वल असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. दिल्लीस्थित एका नामांकीत संस्थेने फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण केले, या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. यामुळे दैनिक स्थैर्यच्या लोकप्रियतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीस्थित एका नामांकीत सर्वेक्षण संस्थेने गत महिन्यात फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे इत्यंभूत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा ऐंशी पानी अहवाल स्थैर्य माध्यम समुहाच्या हाती लागला असून लवकरच हा अहवाल वाचकांसमोर आम्ही मांडणार आहोत. येथील जातीय समीकरणे, विकासकामे आणि गटतटाचे राजकारण याचा पक्षीय बलाबलावर होणारा परिणाम तसेच संभाव्य मतदानावर होणार असलेल्या परिणामाची माहिती याद्वारे समोर येणार आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या नामांकित सर्वेक्षण संस्थेने स्थैर्य माध्यम समुहाची आवर्जून माहिती घेतली. कारण ज्या ज्या ठिकाणी हि संस्था सर्वेक्षणासाठी जात असे, त्या त्या ठिकाणी स्थैर्य माध्यम समुहाचे नाव समोर येत असे.
या संस्थेने दिलेल्या माहितीनूसार, स्थैर्यचे वृत्त हे वस्तुनिष्ठ असते. जे घडते, ते आहे तसे स्थैर्यच्या माध्यमातून समोर येते, असा विश्वास जनतेच्या मनात आहे. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता अखंडितपणे वृत्तसेवा देण्याचे कार्य स्थैर्य करीत आहे. फलटण तालुक्याच्या राजकारणाचा आणि समाजमनाचा ट्रेंड बदलण्यासाठी स्थैर्य हे प्रभावी माध्यम असल्याचा निष्कर्ष समोर येतो आहे. विविध विषयांना वाचा फोडण्याच्या वृत्तीमुळे आज जनतेच्या मनात स्थैर्यने घर केले आहे. म्हणूनच वृत्तांकनाच्या बाबतीत स्थैर्य तालुक्यात अव्वल असल्याचे मत या सर्वेक्षण संस्थेने व्यक्त केले आहे.