दैनिक स्थैर्य | दि. 14 डिसेंबर 2023 | फलटण | संस्थान काळा पासून सुरु असलेली येथील श्रीराम रथोत्सव फलटणसह विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पद्धतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात सुरु आहे. रथोत्सवातील कालच्या मुख्य दिवशी प्रभू श्रीरामाच्या रथाची नगर प्रदक्षिणा भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडली.
नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी सुमारे २८० वर्षांपूवी रथयात्रेची परंपरा सुरु केली असून आजही ती परंपरागत पद्धतीने सुरु आहे. दरवर्षी मार्गशीष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. बुधवारी सकाळी 8.30 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीता मातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. फळे, फुले, पाने आणि विविधरंगी निशाणे लावून, उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. प्रभू श्रीरामाच्या रथाची नगर प्रदक्षिणा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी तहसिलदार डॉ. अभिजित जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर तसेच भाविक व मानकरी उपस्थित होते.
रामरथ यात्रेच्या निमित्ताने फलटण शहरात हनुमानाची गदा, धनुष्यबाण, लगोरी विविध आकाराचे रंगीबेरंगी फुगे, कर्णकर्कश आवाजाची खेळणी, छोटा भीम, वाघ, सिंह यांचे मुखवटे, उंच झोका, मेरी गो-राऊंड, जायंट्स व्हील्स, रेल्वेगाडी, बॉनसी, ब्रेक डान्स पाळणे, सुपल ड्रॅगन चेन आदी शहरी व ग्रामीण भागातील मुलांना आकर्षित करणारी साधने दाखल झाली आहेत. दोन दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागातील मुले व त्यांच्या पालकांची गर्दी होत आहे. यंदा पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. परिसरातील चार कारखान्याचे गाळप नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले आहेत. काही कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. त्यामुळे परंपरागत पद्धतीने देवदिवाळीच्या दिवशी आणि त्यानंतर जवळपास सप्ताहभर चालणाऱ्या या यात्रा उत्सवात शहर व तालुक्यातील अबालवृद्ध उत्सहाने दाखल झाले आहेत. नगर प्रदक्षिणेस निघालेल्या प्रभू श्रीरामाच्या रथाचे आणि प्रभू श्रीराम व सीतामातेच्या दर्शनानंतर भक्त मंडळी यात्रेमधील मेवामिठाई, खेळणी, संसारोपयोगी साहित्य आणि महिलांच्या सौंदर्य अभूषणाच्या स्टॉलकडे वळताना दिसत आहेत. बाळगोपाळांचा ओढा विविध खेळण्यांकडे होता.
यात्रेत यांत्रिक पद्धतीचे उंच पाळणे (जायंट व्हील्स), लहान मोठे मिकी माऊस, कठपुतली शो, छोटी आगगाडी, ब्रेकडान्स पाळणे, सुपर ड्रॅगनसारखी लहान मुलांना आकर्षित करणारी मनोरंजनाची साधने दाखल झाली आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण हायस्कुल पटांगण, जुना डी. एड. कॉलेज चौक परिसरासह लक्ष्मीनगर येथे यांत्रिक खेळण्यांची रेलचेल पहायला मिळते.
शिंगणापूर रोडवरील श्रीमंत रामराजे मार्केटसमोरील प्रशस्त जागेत तसेच महावीर स्तंभापासून उमाजी नाईक चौक ते गजानन चौक या मार्गावर दुतर्फा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल्स लागले आहेत. यामध्ये स्टेशनरी, मेवामिठाई, संसारोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, काचेच्या विविध प्रकारच्या बांगड्या, गळ्यातील माळा, बेंटेक्स दागिने, प्रासंगिक चित्रे, बाळगोपाळांच्या विविध प्रकारच्या खेळण्यांचा समावेश आहे.