दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२३ | फलटण |
विविध कलाकारांच्या गायन, तबला, हलगी, दिमडी, संबळ, हार्मोनियम, पखवाज जुगलबंदीने फलटणकर रसिक मंत्रमुग्ध झाले. येथील कै. दिगंबर देशपांडे यांच्या स्मरणार्थ गुरूकृपा संगीत विद्यालयाने ‘संवाद संगीतोत्सव’ कार्यक्रम आयोजित केला होता.
सौ. सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनिकेत देशपांडे, डॉ. उज्ज्वला शिंदे, बालरोग तज्ञ डॉ. सई खराडे, श्रीनंद हळबे सर, अनंत नेरकर, ऋषीकेश देशमाने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सीमा माने यांनी ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा अभंग, रेवती गोसावी यांनी सोहनी रागावर ‘कोपूनीया पिता पुसे प्रल्हादासी’ हा अभंग, स्मिता खराडे यांनी अबीर गुलाल, स्मृती जाधव यांनी ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’ ही संत मिराबाईंची रचना गायली. कृष्णा भांबुरे, सोहम शेवतेकर, शुभम वष्ट, प्रणव आवटे, मनिषा निंबाळकर, दिपाली निंबाळकर, ज्योत्स्ना वाघमारे यांनी गायन व तबला वादन केले.
या संगीतोत्सवात दहिवडीचे गुरूकृपा, फलटणचे रामकृष्ण, सिध्दीविनायक व गीताई, सासवडचे रणरागिनी या भजनी मंडाळांची भजने झाली. ऋषीकेश देशमाने यांनी ताल उत्सव कार्यक्रम सादर केला. कलाकारांनी देवीचा गोंधळ, कोकणातील दशावतार, कोळीगीते व शाहिरी पोवाडे गायले.
कार्यक्रमाचे आयोजन विलास देशपांडे, अनिकेत देशपांडे व परिवारातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमास श्रीनंद हळबे सर व अनंत नेरकर सर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन दिपाली निंबाळकर यांनी केले, तर स्वाती देशपांडे यांनी आभार मानले.