फलटणमध्ये यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा २०२६ संपन्न


फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीत यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा २०२६ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन व विविध संस्थांची माहिती मिळाली.

स्थैर्य, फलटण, दि. १० जानेवारी : फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी येथे शनिवार १० जानेवारी रोजी यशवंत शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा २०२६ उत्साहात पार पडला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करिअरविषयक योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष सी. एल. पवार, ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळ सदस्य महेंद्र सूर्यवंशी, शिवाजीराव सूर्यवंशी, ज्योतीताई सचिन सूर्यवंशी, सदस्य हणमंतराव निकम आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या उपस्थितीत झाले. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या एन. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार योग्य करिअर पर्यायांची माहिती देणे, हा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीने तयार केलेल्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांना ही दिनदर्शिका मोफत वितरित करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी आपल्या मनोगतात हा मेळावा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगत करिअर निवडीमध्ये मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नंतर ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचा उल्लेख करत, योग्य मार्गदर्शनासाठी फलटणमध्ये प्रथमच हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यात इंजिनिअरिंग कॉलेजेस, करिअर अकॅडमी, स्पोकन इंग्लिश, मानसोपचार तज्ज्ञ तसेच विविध फूड स्टॉल्स उभारण्यात आले होते. शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

विद्यार्थी व पालकांनी करिअरविषयक माहिती घेत समाधान व्यक्त केले. शास्त्र विभागातील विद्यार्थी समीक्षा भिवरकर यांनी आपल्या मनोगतात मेळावा मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यादव एस. डी. व सुजाता पवार यांनी केले, तर आभार राऊत एस. एन. यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!