दैनिक स्थैर्य | दि. 18 जुलै 2024 | फलटण | माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे एकनिष्ठ सहकारी स्व. सुभाष शिंदे यांचे सुपुत्र तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चेतन सुभाष शिंदे हे आज फलटण येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत सलग दोन कार्यक्रमांना दिसल्याने फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कालच चेतन शिंदे यांच्या पत्नी सौ. प्रतिभा चेतन शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर आज लगेच चेतन सुभाष शिंदे हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत सलग दोन कार्यक्रमांना दिसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
फलटण तालुका सहकारी दूध संघावर एकेकाळी ज्येष्ठ नेते स्व. सुभाष शिंदे यांचे वर्चस्व होते. त्यांच्या काळामध्ये दूध संघाचे कामकाज सुद्धा गौरवास्पद असल्याचे मत अनेक जण व्यक्त करीत असतात. दूध संघाच्या मुद्द्यावर चेतन सुभाष शिंदे हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत जात असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.