
दैनिक स्थैर्य । 25 मार्च 2025। फलटण । फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार पूर्वीच्या ठिकाणी म्हणजेच बाजारपेठेत परत भरविण्याची मागणी केली आहे. व्यापारी संघटनांच्या वतीने फलटण शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनुप शहा आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वसीम मणेर (सावकार) यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी नगरपरिषद, तहसीलदार, पोलीस ठाणे आणि प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे बाजारातील व्यापाऱ्यांच्या मागण्यांना उजाळा देण्यात आला आहे.
कोरोना महामारीदरम्यान, आठवडी बाजाराचे विभाजन करून माळजाई मंदिर परिसरात हलविण्यात आले होते. या बदलामुळे फलटण बाजारपेठेतील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. आठवडी बाजार हा फलटण शहरातील व्यापाराच्या केंद्रस्थानी असून तो स्थलांतरित केल्यामुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. परिणामी, व्यापाऱ्यांवरील कर्जाचा भार वाढला आहे, असे मत अनुप शहा यांनी व्यक्त केले आहे.
वसीम मणेर (सावकार) स्पष्ट केले की, फलटणच्या बाजारपेठेत व्यापार करणारा वर्ग नियमित कर आणि भाडे वेळेवर भरतो. मात्र, ऑनलाइन मार्केटिंगमुळे आधीच तोट्यात असलेल्या व्यापाऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे बाजाराचा पूर्ववत बाजारपेठेत पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, व्यापाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनादरम्यान बाजारपेठेत महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची कमतरता असल्याचाही मुद्दा मांडण्यात आला. या सुविधेला तातडीने प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाजारपेठेतील अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्याचाही आग्रह धरला गेला.
प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी व्यापाऱ्यांच्या या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी लवकरच या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.