दैनिक स्थैर्य | दि. 17 जुलै 2024 | फलटण | “उपरा” कांदबरीचे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटचे सहकारी लक्ष्मण माने यांची फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू असल्याचे माहिती समोर येत आहे. आज फलटण येथे काही प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी जिल्हा परिषद गट निहाय आढावा घेतला आहे.
आगामी काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येवून ठेपली आहे. यामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटचे सहकारी लक्ष्मण माने हे चाचपणी करत असल्याचे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे.
सन 2014 साली माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटचे सहकारी लक्ष्मण माने यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय म्हणून लक्ष्मण माने यांची ओळख आहे. मूळचे फलटण तालुक्यातील असलेले माने यांनी सातारा जिल्ह्यासह राज्यामध्ये विविध ठिकाणी शिक्षण संस्थांची स्थापना केली आहे. माने यांच्या शिक्षण संस्थेच्या प्रत्येक वर्धापनदिनास स्वतः शरद पवार यांची उपस्थिती असते. यावरूनच त्यांचे व शरद पवार यांचे सबंध दिसून येत असतात.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी जर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला तर विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपण चांगले कार्य उभे करणार आहे.
– पद्मश्री लक्ष्मण माने.