स्थैर्य, फलटण, दि. ३०: फलटणकरांच्या स्वप्नातील फलटण-पुणे रेल्वे सेवेचे उद्या मंगळवार दि. ३० मार्च रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाइन उदघाटन होत असून बुधवार दि. ३१ मार्च पासून ही रेल्वे सेवा नियमीत सुरु होणार असल्याचे सांगून आगामी काळात फलटण-पुणे मार्गावर दिवसभरात रेल्वेच्या ३/४ फेऱ्या आणि किसान रेल्वे सेवा सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सोलापूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण रेल्वे स्थानकावर आयोजित पत्रकार परिषदेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी तहसीलदार समीर यादव, निवृत्त सनदी अधिकारी व दिशा कमिटीचे सदस्य विश्वासराव भोसले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगर परिषदेतील विरोधी पक्षाचे गट नेते अशोकराव जाधव, ज्येष्ठ नगरसेवक अनुप शहा, सचिन अहिवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पिंटू उर्फ नानासाहेब ईवरे, भटक्या विमुक्त सेलचे सुनील जाधव, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष धनंजय पवार, अमित रणवरे, राहुल शहा, तुकाराम शिंदे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी फलटण – पुणे अनारक्षीत डेमु गाडीची नियमीत सेवा बुधवार दि. ३१ मार्चपासून सुरु होईल. गाडी क्रमांक 01435 पुणे येथून सकाळी ०५.५० वाजता सुटेल आणि ०९.३५ वाजता फलटणला पोहोचेल, परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01436 फलटण येथून सायंकाळी १८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे २१.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील अशी माहिती यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण रेल्वे स्थानक शहराच्या उत्तरेस फलटण-जिंती रस्त्यावर चौधरवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत शहरापासून सुमारे २ कि. मी. अंतरावर असून तेथे एस. टी. बस, रिक्षा, खाजगी वाहनाने जाता येणार असून तेथे वाहन तळाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे तसेच फलटण ते रेल्वे स्थानक अशी एस. टी. बस सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
राज्य शासनाने स्थानिक प्रशासकीय स्तरावर अत्यावश्यक सेवेतील संबंधीत लोकांना फलटण प्रांताधिकारी कार्यालयातून क्यू. आर. कोड आधारित ओळखपत्रे/पास दिले जातील. पुणे पोलिस आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जे संपूर्ण प्रक्रिया पुर्ण करुन क्यू. आर. कोड आधारित ओळखपत्रे/पास जारी करतील. प्रांताधिकारी फलटण व पोलीस आयुक्त पुणे अत्यावश्यक सेवेतील लोकांची ओळख पटवून त्यांना ओळख पत्र जारी करतील, ही ओळखपत्रे क्यू. आर. कोड आधारित पास असतील.
अत्यावश्यक सेवेतील लोक रेल्वे स्टेशनवर क्यू. आर. कोड आधारित ओळखपत्र/पास दाखवून तिकीट खरेदी करुन प्रवास करु शकतात असे रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले आहे.
फलटण तहसील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील लोकांना क्यू. आर. कोड बाबत संपूर्ण माहिती दिली जाणार असून त्यासाठी तहसील कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले.
या डेमू ट्रेनच्या उदघाटन प्रसंगी रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री भारत सरकार ना. पीयूष गोयल व्हिडिओ लिंक द्वारे हिरवा झेंडा दाखवून फलटण-पुणे रेल्वे सेवेचे उदघाटन करणार असून या प्रसंगी पर्यावरण, वन, हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री भारत सरकार ना. प्रकाश जावडेकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालक मंत्री ना. अजित पवार, राज्याचे सहकार पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, विधान सभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. गिरीश बापट, खा. श्रीमती सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. श्रीमती वंदना चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. सुनील कांबळे, नगराध्यक्षा नीता नेवसे आदी मान्यवर या समारंभास निमंत्रित करण्यात आले आहेत.
सदर समारंभ फलटण रेल्वे स्थानक येथे मंगळवार दि. ३० रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात येत आहे. सदर समारंभात ऑनलाईन सहभागी होण्यासाठी –
http://www.youtube.com/railminindia येथे सहभागी व्हावे लागेल.