फलटण तालुका शिवजयंती एकत्रितच साजरी करणार; छत्रपती शिवरायांसाठी काहीही – श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ एप्रिल २०२३ | फलटण |फलटण तालुका गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सव एकत्रित साजरा करत आहे. ‘एक शिवजयंती’साठी तालुक्यातील सर्व मंडळे, तरुण मंडळी, युवतीही सहकार्य करत आहेत. त्यामुळे सर्वांनी छत्रपती शिवरायांसाठी मनात मानपान न आणता एकत्रित शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा व ‘छत्रपती शिवरायांसाठी काहीही’ ही भूमिका ठेवून तालुक्यात ‘एक शिवजयंती’ साजरी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

श्रीमंत संजीवराजे शिवजयंती उत्सवाबाबत बोलताना म्हणाले की, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आपण सर्वजण मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करत असतो. यावर्षी देखील २२ एप्रिल रोजी फलटण तालुका एकत्रितरित्या शिवजयंती उत्सव आपण सर्वजण साजरा करणार आहोत. २०१६ साली पहिल्यांदा शिवजयंती उत्सव एकत्रितरित्या साजरी करण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवजयंती उत्सव एकत्रितरित्या साजरा करावा असा निर्णय झाला. पंचायत समितीत सर्व मंडळींनी बैठक घेऊन तसा निर्णय घेतला. त्याप्रमाणे फलटण तालुक्यात सर्वजण एकत्रित येऊन शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर स्व. नंदकुमार भोईटे यांनी त्यावेळी पुढाकार घेतला. त्यावेळी तालुक्यातील सर्वच मंडळांनी त्यांना सहकार्य केले. तालुक्यातील सर्व तरुणांनी, युवतींनीही सहकार्य केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वजण एकत्रित येऊन शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरी करत आहोत.

यावर्षीदेखील तशाच प्रकारचा निर्णय झाला आणि फलटण तालुक्यातून माळजाईपासून भव्य मिरवणूक निघावी, त्याचप्रमाणे २२ तारखेला सकाळी ८.५० वाजता गेल्यावर्षी प्रमाणे भव्य मोटारसायकल रॅली निघावी, असे कार्यकर्त्यांमधून सूचविण्यात आले आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच २२ तारखेला कार्यक्रम करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. फलटण तालुक्यात एकत्रित शिवजयंती उत्सव साजरा करावा, असा हेतू सर्वांचाच आहे. हा निर्णय पुढच्याही काळात राहणार आहे. त्याप्रमाणे कुठलीही प्रतिष्ठा कोणीही न ठेवता जे काही त्या बैठकीत विषय झाले असतील, ते सर्व विषय बाजूला ठेवून एकत्रितपणे आपण सर्वांनी शिवजयंती उत्सव साजरा करावा, असे मी म्हणत आहे. यामध्ये दुसरा कोणताही विषय घेण्याचे काही कारण राहत नाही, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढणार आहोत. त्यामध्ये कोणाच्याही प्रतिष्ठेची आपण मिरवणूक काढणार नाही. त्यामुळे सगळेच विषय शिवाजी महाराजांसाठी बाजूला ठेवून ‘शिवाजी महाराजांसाठी काहीही’ एवढीच भूमिका ठेवून या ठिकाणी सर्वांनी एकत्रित यावे. या ठिकाणी कोणाचेही नाव असणार नाही. सर्वांनी शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर एकत्रित साजरा करावा, असेच आवाहन या ठिकाणी मी करत आहे.

सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीसाठी मनात कोणताही मानपान न आणता काहीही करण्याची माझी स्वत:ची तयारी निश्चित आहे, असेही शेवटी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!