
दैनिक स्थैर्य | दि. 02 ऑगस्ट 2024 | फलटण | केंद्र व राज्यसरकार पुरस्कृत योजनांच्या अंतर्गत असणार्या संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान वितरणात सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्याचा प्रथम क्रमांक असून संपूर्ण राज्यातसुद्धा फलटण तालुका अग्रेसर असल्याची माहिती तहसिलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ.अभिजीत जाधव म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेच्या एकूण 4 हजार 480 लाभार्थ्यांना जुलै 2024 अखेरचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. नुकतीच संजय गांधी निराधार योजनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये योजनेच्या अंमलबाजवणीत फलटण तालुका सर्वाधिक आघाडीवर आहे.
यासोबतच शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत फलटण तालुक्यामधील एकूण 2 हजार 962 लाभार्थ्यांना जुलै 2024 अखेरचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील (एस.सी.) 41 लाभार्थ्यांना जुलै 2024 अखेरचे अनुदान बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेत 1478 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेत 333 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना 14 लाभार्थी, राष्ट्रीय लाभ योजना 1, स्वातंत्र्य सैनिक 5 लाभार्थी, आणीबाणी कालावधी 5 लाभार्थी असून मार्च 2024 अखेर त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात अदा करण्यात आले असून शासनाकडून निधी प्राप्त होताच उर्वरित अनुदान संबंधितांना वितरित करण्यात येणार आहे, असेही तहसिलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी सांगितले.