फलटण तालुका क्रीडा संकुलाला संजीवनी मिळणार; आमदार सचिन पाटील यांच्या पुढाकाराने नूतनीकरणाचा मार्ग मोकळा

अद्ययावत सुविधांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे क्रीडा अधिकाऱ्यांना निर्देश; निधीची हमी


स्थैर्य, फलटण, दि. 13 सप्टेंबर: येथील तहसील कार्यालयात आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा संकुल समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मोठे जाधववाडी येथील क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेवर चर्चा करण्यात आली आणि त्याच्या नूतनीकरणासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार पाटील यांनी दिले. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची हमीही त्यांनी दिली.

या बैठकीत बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, “मोठे जाधववाडी येथील क्रीडा संकुलात इनडोअर हॉल, धावन मार्ग आणि प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अनेक वर्षांपूर्वी पूर्ण झाले, मात्र हे संकुल सध्या मृत अवस्थेत आहे. येथील सिंथेटिक फ्लोअरिंग खराब झाले असून, या संकुलाचा तालुक्यातील सर्वसामान्य खेळाडू-विद्यार्थ्यांना कधीच उपयोग झाला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीत क्रीडा संकुलाच्या इमारतीची दुरुस्ती व रंगकाम, वीजपुरवठा, संगणक संच, धावपट्टीचे नूतनीकरण, सिंथेटिक फ्लोअरिंगची दुरुस्ती तसेच खो-खो, हॉकी, कबड्डी, जलतरण तलाव (Swimming Tank) आणि व्यायामशाळा (Gymnasium) यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

“तालुक्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना याचा फायदा व्हावा, इथून देशपातळीवरचे खेळाडू घडावेत, यासाठी हे क्रीडा संकुल अद्ययावत करणे आवश्यक आहे. लागणारा सर्व निधी आपण उपलब्ध करून देऊ,” असे आश्वासन आमदार सचिन पाटील यांनी दिले.

या बैठकीस आमदार सचिन पाटील यांच्यासह तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, फलटण नगरपरिषद मुख्याधिकारी निखिल मोरे आणि विविध खेळांचे प्रशिक्षक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!