फलटण | कर्ज फेडता येत नसेल तर पायउतार व्हा; आम्ही दूध संघ कर्ज मुक्त करतो : माजी खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 18 जुलै 2024 | फलटण | फलटण दूध संघावर कर्ज असल्याने दूध संघाची जमीन विक्री करण्याचा कुटील डाव सत्ताधारी मंडळींनी आखला आहे. जर तुम्हाला दूध संघ चालवता येत नसेल तर दूध संघावरून पायउतार व्हा; आम्ही दूध संघ कर्ज मुक्त करू शकतो. स्वतःच्या खाजगी दूध संस्था ह्या व्यवस्थित चालत आहे व सहकारी दूध संघ चालू शकत नाही; ही केविलवाणी गोष्ट आहे; असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयात दूध संघाची जमीन विक्री विरोधात आयोजित मोर्चामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते चेतन सुभाष शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण तालुका सहकारी दूध संघावर जे कर्ज असेल ते कर्ज फेडण्याची धमक आमच्यामध्ये आहे. दूध संघाची कोणतीही जमीन न विकता दूध संघ आम्ही कर्जमुक्त करू शकतो. सत्ताधारी मंडळींना जर दूध संघ नीट चालवता येत नसेल तर त्यांनी राजीनामे देऊन पायउतार व्हावे; आम्ही सहकारी दूध संघ उत्तमरित्या चालवु शकतो; असे मत यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले की; साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स हा शेकडो कोटींचा कारखाना अत्यल्पभावामध्ये दत्त इंडिया कंपनीला या सत्ताधारी मंडळींनी विकला असून तालुक्यामध्ये असणाऱ्या संस्था मोडीत काढण्याचे काम सत्ताधारी मंडळी करीत आहेत. या सोबतच यांच्याकडे असणाऱ्या सहकारी संस्था त्यामध्ये श्रीराम कारखाना हा दुसऱ्याला चालवायला दिला आहे. मालोजी बँक सुद्धा बुलढाणा पतसंस्थेला चालवायला दिलेली आहे.

यावेळी चेतन सुभाष शिंदे, नंदकुमार मोरे व प्रदीप झणझणे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!