फलटण: एसटी आगारात राष्ट्रीय सुरक्षा मोहिमेचा शुभारंभ; सुरक्षित प्रवासावर भर


फलटण एसटी आगारात १ ते ३१ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार असून उद्घाटनप्रसंगी सुरक्षित प्रवास आणि नियमपालनाचे आवाहन करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. 12 जानेवारी : फलटण येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात १ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन विभागीय भांडार अधिकारी श्री. गायकवाड आणि सहायक पोलिस निरीक्षक श्री. धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.

राज्य परिवहन महामंडळ फलटण आगारात राष्ट्रीय सुरक्षा मोहिमेचा अधिकृत शुभारंभ झाला. १ ते ३१ जानेवारी या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे सुरक्षित वाहनचालना, नियमपालन आणि प्रवासी सुरक्षेवर भर देण्यात येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. गायकवाड यांनी “सुरक्षितता ही काळाची गरज असून सुरक्षित प्रवास हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे” असे नमूद केले. चालक, वाहक आणि कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांना सुरक्षित सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सहायक पोलिस निरीक्षक श्री. धायगुडे यांनी वाहन चालवताना रस्त्यावरील इतर वाहने व पादचारी यांची दक्षता घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. सुरक्षित वाहनचालना केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुरक्षितता अभियानाच्या अनुषंगाने आगारातील चालक, वाहक, यांत्रिक व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची प्रतिज्ञा देण्यात आली. उपस्थित चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री. लोंढे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहायक वाहतूक निरीक्षक निरज अहिवळे यांच्यासह बहुसंख्य चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!