
स्थैर्य, फलटण, दि. ०५ सप्टेंबर : सरडे, ता. फलटण येथील शेळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सरडे येथील एका शेतकऱ्याची ६०,००० रुपये किमतीची उस्मानाबादी जातीची दोन वर्षे वयाची शेळी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दालवडी, ता. फलटण येथील आरोपी नितीन जयवंत जाधव याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी नितीन जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली असून, हा गुन्हा इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले. या दोन साथीदारांपैकी एक जण अल्पवयीन असून, दुसरा साथीदार फरारी आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींकडून चोरीला गेलेली शेळी जप्त करण्यात आली आहे.
आरोपीकडे आणखी तीन शेळ्या आढळून आल्या आहेत. यामध्ये दोन मादी आणि एका नराचा समावेश असून, त्यांच्या कानात विम्याचे बिल्ले आहेत. या शेळ्या ज्यांच्या असतील त्यांनी ओळख पटवून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उप-विभागीय पोलीस अधिकारी भालचिम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक नितीन चौगुले, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ओबासे करीत आहेत.