
दैनिक स्थैर्य । 25 मार्च 2025। फलटण । शहरातील महात्मा फुले शॉपिंग मंडईच्या पाठीमागे वडार कॉलनीत बराच काळ प्रलंबित असलेल्या सार्वजनिक सौचालायाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न शेवटी मार्गी लागला आहे. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक सौचालायाचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर शासन स्तरावर तातडीने उपाययोजना व्हावी, अशी मागणी स्थानिक सामाजिक संघटनांनी केली होती.
श्रीमंत श्रीराम गणेशोत्सव मंडळ आणि श्रीमंत जय श्री राम गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी हा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले यांच्याकडे उपस्थित केला. स्थानिकांच्या या उद्रेकाला गांभीर्याने घेत, संदीप चोरमले यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांच्याशी चर्चा करून संबंधित काम मार्गी लावले.
त्यानुसार, सार्वजनिक सौचालायाच्या दरवाज्यांचे नूतनीकरण तात्काळ करण्यात आले. या कामामुळे वडार कॉलनीसह जवळच्या परिसरातील नागरिकांना आता सुरक्षित आणि स्वच्छ सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांनी या कामासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संदीप चोरमले यांनी या उपक्रमानंतर वक्तव्य करताना सांगितले की, “सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न हा केवळ सौंदर्याचा मुद्दा नसून तो नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अशा मूलभूत सुविधांसाठी लोकप्रतिनिधींना नेहमीच सजग असले पाहिजे.” त्यांनी निखिल मोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याबद्दलही आभार मानले.