
फलटण शहरात विनाकारण वेगाने आणि कर्कश आवाजात फिरणाऱ्या बुलेट व इतर दुचाकींवर शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. यात ६ बुलेट आणि १ यामाहा गाडीवर कारवाई करत तब्बल ६०,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 27 फेब्रुवारी : शहरात विनाकारण वेगाने गाड्या चालवणाऱ्या आणि विशेषतः बुलेट गाड्यांना ‘मॉडिफाईड सायलेन्सर’ बसवून कर्णकर्कश आवाज करत दहशत माजवणाऱ्या रोडरोमिओंवर फलटण शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्या मदतीने धडक मोहीम राबवत ६ बुलेट आणि १ यामाहा गाडीच्या मालकांकडून एकूण ६०,५०० रुपयांचा दंड वसूल केला असून, बुलेटचे सायलेन्सरही काढून घेतले आहेत.
विशेष मोहिमेत ७ गाड्या ताब्यात
फलटण शहर पोलीस ठाण्याकडून बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) शहरात मोठ्या व कर्कश आवाजात फिरणाऱ्या आणि विनाकारण वेगात मोटारसायकल चालवणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एका ‘विशेष मोहिमेचे’ आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी शहरातील विविध भागांतून एकूण ६ बुलेट व १ यामाहा अशा ७ मोटारसायकली ताब्यात घेतल्या. या सर्व बुलेट मोटारसायकलींना ‘मॉडिफाय’ केलेले सायलेन्सर बसवण्यात आले होते, तर यामाहा गाडीही मॉडिफाय करण्यात आलेली होती.
RTO कडून ५५,५०० आणि पोलिसांकडून ५,००० चा दंड
या गाड्यांवर प्रभावी आणि कडक कारवाई व्हावी यासाठी शहर पोलिसांनी मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), फलटण यांना अहवाल पाठवला. या अहवालानुसार RTO अधिकाऱ्यांनी या मोटारसायकलींची कसून तपासणी केली आणि मोटारसायकल चालक व मालक यांना मिळून तब्बल ५५,५००/- रुपयांचा मोठा दंड आकारला. त्याचबरोबर, सर्व बुलेट गाड्यांचे नियमबाह्य सायलेन्सरही काढून घेण्यात आले आहेत.
या कारवाईसोबतच, फलटण शहर पोलीस ठाण्याकडून या मोटारसायकलींवर मोटार वाहन कायद्यान्वये प्रलंबित असलेला ५,०००/- रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. अशाप्रकारे एकूण ६०,५००/- रुपये दंड या कारवाईत वसूल करण्यात आला आहे.
‘कारवाई सातत्याने सुरू राहणार’ : पो. नि. अरविंद काळे
शा प्रकारची शहरात दहशत माजवणारी, कर्कश आवाजात फिरणारी आणि विनाकारण वेगात चालवली जाणारी वाहने, तसेच त्यांच्या मालकांवर यापुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदरची यशस्वी कारवाई सातारा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे आणि त्यांच्या पथकातील सफौ. एस. एस. शिंदे, पो. कॉ. पी. बी. धायगुडे, पो. कॉ. आर. डी. खरात, पो. कॉ. एस. बी. जगताप, व पो. कॉ. एस. एस. परिहार यांनी केली आहे.
