फलटण प्लास्टिकच्या विळख्यात! कचरा कुंड्या पुन्हा बसवा; नागरिकांची मागणी


फलटणमध्ये वाढत्या प्लास्टिक कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे निवेदन. सार्वजनिक कचरा कुंड्या पुन्हा बसवण्याची मागणी.

स्थैर्य, फलटण, दि. 19 फेब्रुवारी : फलटण शहरात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण या पर्यावरणप्रेमी संस्थेने प्रांत अधिकारी तसेच मुख्याधिकारी फलटण यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक भागांतून कचरा कुंड्या हटविल्यानंतर नागरिक घंटा गाडीत नियमितपणे कचरा टाकत नाहीत. परिणामी रस्ते, मोकळ्या जागा व नाल्यांमध्ये प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा साचत असून गंभीर स्वच्छता समस्या निर्माण झाली आहे.

संस्थेने प्रशासनाकडे पूर्वीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या पुन्हा बसवण्याची मागणी केली आहे. नागरिकांना कचरा टाकण्यासाठी सोयीची व शिस्तबद्ध व्यवस्था उपलब्ध झाली तर रस्त्यांवरील कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, असा संस्थेचा विश्वास आहे.

यासोबतच प्लास्टिक कचऱ्याचे योग्य संकलन व शास्त्रीय व्यवस्थापन, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवणे तसेच नियमित स्वच्छता मोहिमा राबवण्यावरही भर देण्यात आला आहे.

संस्थेचे स्वयंसेवक दर रविवारी शहरातील विविध भागांत स्वच्छता उपक्रम राबवून गोळा केलेला प्लास्टिक कचरा नगरपालिकेकडे सुपूर्द करतात. प्रशासनाला प्रत्यक्ष सहकार्य करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.

फलटण शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक राहावे यासाठी संस्थेने उचललेले हे पाऊल नागरिकांमध्ये प्रेरणादायी ठरत आहे. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!