दैनिक स्थैर्य | दि. ९ जुलै २०२४ | फलटण |
सालाबादप्रमाणे दि. ६ जुलै २४ रोजी महाराष्ट्र सायकल क्लबने फलटणच्या वतीने फलटण – पंढरपूर सायकलवारीचे आयोजन केले आहे. ही वारी पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर तेथे सायकलवारी संमेलन असते. यामध्ये अनेक सायकलिस्ट सहभागी होतात.
फलटण-पंढरपूर सायकलवारीत एकूण ३५ सायकलिस्ट सहभागी झाले होते. त्यामध्ये ८ महिला होत्या. मुंबई, पुणे, नीरा, दौंड, फलटण अशा विविध भागातील सायकलिस्ट यामध्ये सामील झाले होते. या वारीसाठी ‘व्हील स्पोर्टस्’ या सायकल शॉपने सायकलींसाठी मोफत सहकार्य केले आहे.
या सायकलवारीला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार अभिजित जाधव उपस्थित होते. पहाटे ५.३० वाजता प्रांताधिकारी यांच्या हस्ते नारळ वाढवून वारीचा संकल्प घेतला. दोन्हीही अधिकार्यांनी हिरवा झेंडा दाखवून वारीस चालना दिली. फलटणमधून जाताना श्रीमंत मालोजीराजे, संत सावता माळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना पाटील या थोर पुरूषांना अभिवादन करून सायकलवारी मार्गस्थ झाली.
या वारीचे सर्व नियोजन महाराष्ट्र सायकल क्लबचे राम मुळीक व त्यांच्या टीमने केले आहे.
वारीला शुभेच्छा देण्यासाठी राजेश हेंद्रे, अरविंद मेहता, मिसाळ व शक्तिमान सायकल क्लबचे सर्व सदस्य हजर होते.