
थेट WhatsApp वर मिळवा
समानतेची भावना रुजवण्यासाठी ‘यशवंत विचार’ प्रत्येकापर्यंत पोहोचावा, असे मत १५ व्या संमेलनाध्यक्ष धैर्यशील देशमुख यांनी व्यक्त केले.
स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रणासाठी नांदी साहित्य संमेलन आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन श्री सद्गुरु उद्योग समूहाच्या महाराजा आयकॉन सभागृहात आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार, फलटणच्या उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, संमेलन कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ उपस्थित होते.
धैर्यशील देशमुख यांचे प्रतिपादन
महाराष्ट्राचे खरे शिल्पकार यशवंतराव चव्हाण असून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचा विचार आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आहे, परंतु समाज व राज्यकर्ते त्यांच्या विचारापासून परावृत्त होत असल्याचे धैर्यशील देशमुख यांनी सांगितले. समाजात समानतेची भावना रुजवणे महत्त्वाचे असून त्यासाठी ‘यशवंत विचार’ राज्यातील सर्वांना नव्याने कळले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज समाजवादाच्या नावाखाली जातीयवादी प्रवृत्ती वाढतानाचे दुर्दैवी चित्र दिसत असून संतांना व महापुरुषांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत बंद केले जात आहे; अशा प्रकारे थोर व्यक्तींच्या वाटण्या झाल्या तर देशात सामाजिक क्रांती होणार नाही, त्यामुळे हे प्रकार टाळून सर्वांनी एकत्रित राहून काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
मराठी ही आपली लोकभाषा तर इंग्रजी ही आपली ज्ञानभाषा असून आज लोकभाषेवर ज्ञानभाषेचे आक्रमण झाल्याचे स्पष्ट करत प्रगल्भ मराठीसाठी सर्वांकडून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा धैर्यशील देशमुख यांनी व्यक्त केली. विकासाचा डांगोरा पिटला जातो, मात्र सर्वसामान्यांपर्यंत तो पोहोचतो का हा खरा प्रश्न आहे; शेतीचा विकास अनेक शतके थांबलेला असून शेतकरी आर्थिक विवंचनेत असल्याने तकलादू कर्जमाफी त्याचे कल्याण करू शकत नाही, असेही ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यिक योगदान महान असले तरी साहित्य व संस्कृती संवर्धनासाठी त्यांनी सुरू केलेल्या संस्थांवरील सदस्य निवडीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याचे दिसून येते आणि या संस्थांना स्वायत्तता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. रविंद्र बेडकिहाळ यांच्या मागणीनुसार देवराष्ट्रे येथे यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक होण्यासाठी आणि त्यांच्या नावे साहित्य अकादमी सुरू होण्यासाठी संमेलनात ठराव करून तो मुख्यमंत्र्यांना पाठवूया, असे आवाहन धैर्यशील देशमुख यांनी केले.
प्रसाद मिरासदार यांचे विचार
संमेलन उद्घाटनप्रसंगी प्रसाद मिरासदार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागवताना त्यांची जडणघडण विचारात घेणे गरजेचे आहे आणि सर्व मतप्रवाहांचा संगम असलेले त्यांचे साहित्य वाचनीय व महाराष्ट्राच्या विकासाचा मूलगामी विचार मांडणारे आहे. दि. 27 ते 30 जानेवारी 2027 दरम्यान पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांना समाविष्ट करण्यासाठी नांदी संमेलन होत असून हे संमेलन वैचारिकदृष्ट्या समृद्ध पार पाडायचे आहे. या संमेलनात सर्व साहित्याचा संगम दिसल्यास ती यशवंतराव चव्हाण यांना खरी आदरांजली आणि मराठी भाषेला पुढे नेणारी ऐतिहासिक घटना ठरेल, असे मिरासदार यांनी सांगितले.
प्रियदर्शनी भोसले आणि डॉ. सचिन सूर्यवंशी यांचे मनोगत
मराठी भाषा टिकवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, लहान वयापासून मुलांना वाचनाची सवय लागावी, ज्येष्ठांनी मराठी साहित्य नातवंडांपर्यंत न्यावे आणि मराठी संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रियदर्शनी भोसले म्हणाल्या. फलटणमधील लेखकांची पुस्तके अभिमानास्पद असून मराठी साहित्य उत्कृष्ट आहे आणि उत्कृष्टच राहील, असा विश्वास व्यक्त करत फलटण शहरात नव्याने सांस्कृतिक भवन, ग्रंथालय, कलादालन आणि वस्तू संग्रहालय निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कार्यरत असून त्यांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केले व त्यांचा विचार कधीही पुसला जाणार नाही, तसेच साहित्य चळवळ रुजण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे संमेलन कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी सांगितले.
रविंद्र बेडकिहाळ यांची भूमिका आणि विविध उपक्रम
देवराष्ट्रे या जन्मगावी यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक आजही नसल्याबद्दल रविंद्र बेडकिहाळ यांनी खंत व्यक्त करत त्यांच्या विचारांचे बोट सोडल्याने महाराष्ट्रातील राजकारणाची पिछेहाट झाल्याचे म्हटले. फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी रुजवलेली साहित्यिक व सांस्कृतिक परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांतून होत असल्याचे सांगत प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दीनिमित्त फलटणमध्ये मध्यवर्ती ठिकाणी त्यांच्या नावे सभागृह, मध्यवर्ती ग्रंथालय आणि कलादालन व्हावे, अशी अपेक्षा बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
उपस्थित मान्यवर आणि सहभाग
यावेळी यशवंतराव चव्हाण यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले, तर फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रियदर्शनी भोसले यांच्या हस्ते झाले. ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे पुरस्कृत स्व. सुलेखाताई शिंदे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने धुमाळवाडी (ता. फलटण) येथील सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई यशवंत कांबळे यांना सन्मानित करण्यात आले, तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी वर्षानिमित्त म.सा.प. फलटण शाखा आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि मराठी भाषा विभागाच्या माहितीपटाचे प्रक्षेपण करण्यात आले. रणजितसिंह भोसले यांच्या हस्ते धैर्यशील देशमुख यांचा आणि डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांच्या हस्ते प्रसाद मिरासदार यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन आनंदा पवार यांनी केले, मान्यवरांचे परिचय म.सा.प. शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे व प्रा. रविंद्र कोकरे यांनी करून दिले, तर आभार शाखा कार्यवाह अमर शेंडे यांनी मानले. याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर, सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सरव्यवस्थापक संदीप जगताप, फलटण ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत दाणी, श्रीपाद विभुते, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र फडतरे, जयंत सहस्त्रबुद्धे, इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य तसेच साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



