श्रीराम यात्रेच्या मुहूर्तावर फुटणार प्रचाराचे नारळ; दोन्ही गटात स्टार प्रचारकांची फौज सज्ज!


  • अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण; प्रभागांमधील लढतींचे चित्र स्पष्ट

  • श्रीराम यात्रेच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडणार

  • नगराध्यक्षपदासाठी समशेरसिंह वि. अनिकेतराजे यांच्यात थेट लढत

स्थैर्य, फलटण, दि. 20 नोव्हेंबर : फलटणचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यात्रेच्या निमित्ताने नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी (दि. १८) उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडल्याने आता शहरातील सर्व प्रभागांमधील आणि नगराध्यक्षपदाच्या प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यात्रोत्सवाचा मुहूर्त साधत दोन्ही गटांच्या प्रचाराच्या तोफा आता धडाडणार आहेत.

युती आणि आघाडीचे चित्र स्पष्ट

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी युती केली असून, त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना रिंगणात उतरवले आहे.

दुसरीकडे, राजे गटाने शिवसेनेच्या (शिंदे गट) धनुष्यबाण चिन्हावर अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; स्टार प्रचारक निश्चित

निवडणुकीचे बिगुल वाजल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचे तगडे नियोजन केले आहे. दोन्ही गटांकडून स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवण्यात येणार आहे.

भाजपा-राष्ट्रवादी युतीचे स्टार प्रचारक:

  • माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

  • आमदार सचिन पाटील

  • जिल्हा बँक संचालक शिवरूपराजे खर्डेकर

  • जिल्हा नियोजन समिती सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर

  • सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे दिलीपसिंह भोसले

  • स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर

  • जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर

  • जेष्ठ नेते भीमदेव बुरुंगले

शिवसेना आणि राजे गटाचे स्टार प्रचारक:

  • आमदार रामराजे नाईक निंबाळकर

  • माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर

  • माजी आमदार दीपक चव्हाण

  • बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर

  • जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर

  • जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर

  • पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर

  • गोविंद मिल्कचे संचालक सत्यजितराजे नाईक निंबाळकर

श्रीराम यात्रेच्या धार्मिक वातावरणात राजकीय प्रचाराचा नारळ फुटणार असल्याने फलटणमधील वातावरण आता चांगलेच तापणार आहे.


Back to top button
Don`t copy text!