दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात फलटण नगर परिषदेचा गलथान कारभार, मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार, नगर रचनाकार रोहित पाटील यांच्या मनमानी काळ्या कारभाराचा पर्दाफाश करून संबंधिताच्या संपत्तीची चौकशी करून कारवाई करावी व निलंबन करावे व तातडीने फलटणमधून बदली करावी, यासंदर्भात विधान परिषदेमधील खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे व विधान सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून लक्षवेधी, तारांकित प्रश्न उपस्थित होणार आहे. या हिवाळी अधिवेशनात फलटण नगर परिषदेच्या विविध विभागांची उचित चौकशी करावी म्हणून आवाज उठणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी दिली आहे.
नंदकुमार मोरे यांनी नगर परिषदेतील सहाय्यक नगर रचनाकार रोहित पाटील हे विकास कामांच्या रेखांकनाबाबत किंवा बांधकाम परवानगीबाबत छाननी करताना अत्यंत बेजबाबदारपणे व मनमानी करून भ्रष्ट काम करतात. बांधकाम परवानगी देण्याच्या बदल्यात आर्थिक देवाण-घेवाण करणे यातच त्यांचे स्वारस्य असते. म्हणून अशा गलथान व भ्रष्ट कारभार करणार्या अधिकार्याची तात्काळ बदली करावी, अशी मागणी पत्राद्वारे नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे केली आहे.
तसेच सहाय्यक नगर रचनाकार रोहित पाटील यांनी अनेक गृहप्रकल्प व बांधकाम परवानगी देण्याबाबत संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी प्राप्त करून घेतलेली आहे. त्यांनी शहरातील काही ओपन स्पेससुध्दा काही बिल्डरांना मध्यस्थी करून बांधकाम करण्यासाठी दिल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी व त्यांची तात्काळ बदली करावी. तसा प्रस्ताव आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयास द्यावा अन्यथा नगर परिषद मुख्यालयासमोर नाईलाजास्तव मला उपाषेणाचा मार्ग अवलंबावा लागेल, याची नोंद आपण व संबंधित विभागाने घ्यावी व रोहित पाटील यांची तात्काळ फलटण नगर परिषदेतून बदली करावी, अशी मागणीही नंदकुमार मोरे यांनी केली आहे.