फलटणकरांनो सावधान! ‘ही’ तारीख हुकली तर नळ तोडणार; मुख्याधिकारी निखिल जाधवांचा ‘अल्टिमेटम’; सार्वजनिक नळही कायमचे होणार बंद!


फलटण नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन धारकांसाठी ३१ जानेवारीची ‘डेडलाईन’ दिली आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाईसह कनेक्शन कायमचे तोडण्याचा इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे. सार्वजनिक नळांबाबतही मोठा निर्णय. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. 14 जानेवारी : फलटण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि पाणीगळती रोखण्यासाठी नगरपरिषदेने आता ‘अॅक्शन मोड’मध्ये येत अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शहरातील ज्या नागरिकांनी बेकायदेशीर (अनधिकृत) नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांना ते नियमित करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत जर कनेक्शन अधिकृत केले नाही, तर थेट नळ कनेक्शन तोडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा सणसणीत इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.

स्वतःहून पुढे या, दंड वाचवा!

नगरपरिषदेने नागरिकांना एका हाताने कडक इशारा दिला असला, तरी दुसऱ्या हाताने सहकार्याची भूमिकाही घेतली आहे. ३१ जानेवारीपर्यंत जे नागरिक स्वतःहून पालिकेत येऊन आपल्या अनधिकृत नळ कनेक्शनची नोंदणी करतील, त्यांचे कनेक्शन कोणताही दंड न आकारता नियमित करून दिले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना ही एक शेवटची संधी (Golden Opportunity) मानली जात आहे.

१ फेब्रुवारीनंतर ‘हंटर’ चालणार

दिलेल्या मुदतीत (३१ जानेवारी) जे नागरिक आपले नळ कनेक्शन नियमित करणार नाहीत, त्यांच्यावर १ फेब्रुवारीपासून नगरपरिषदेची धडक कारवाई सुरू होईल. यामध्ये संबंधित अनधिकृत कनेक्शन कोणाचीही गय न करता कायमचे बंद करण्यात येईल. इतकेच नाही तर संबंधित मिळकतधारकावर नियमानुसार कडक दंडात्मक कारवाई देखील केली जाईल, असे मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील सार्वजनिक नळ होणार बंद!

पाणी पुरवठा सुधारण्याच्या दृष्टीने आणखी एक धाडसी निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील सर्व ‘सार्वजनिक नळ कनेक्शन’ (Stand posts) आता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. या नळांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने पर्यायी व्यवस्था सुचवली आहे. अशा नागरिकांनी दोन ते पाच कुटुंबांचा गट करून ‘ग्रुप नळ कनेक्शन’ (Group Connection) घेण्यासाठी अर्ज करावा, असा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पाणीपुरवठा सुधारण्यासाठी कटिबद्

फलटण शहरातील नागरिकांना योग्य दाबाने आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अनधिकृत जोडण्यांमुळे अधिकृत ग्राहकांच्या पाण्याच्या दाबावर परिणाम होतो. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!