फलटण नगरपालिकेची आजपासून डुकरे पकडण्याची मोहीम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण नगरपालिकेने आजपासून शहरातील मोकाट फिरणारी डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.

फलटण शहरामध्ये बर्‍याच दिवसांपासून नागरिकांना डुकरांचा त्रास असल्याबाबत नगरपालिकेकडे तक्रारी येत होत्या. त्याचप्रमाणे यासंदर्भात वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा नागरिकांच्या तक्रारीचे दखल घेऊन बातमी आलेल्या होत्या. यापूर्वी नगरपालिकेनेसुद्धा वराह पालन करणार्‍या मालकांना नोटीसा देऊन डुकरांना शहरांमध्ये मोकाट सोडण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत लेखी सूचना दिलेल्या होत्या. तथापि, यामध्ये फरक झालेला नसल्यामुळे नगरपालिकेने पुन्हा एकदा शेवटची संधी देऊन वर्तमानपत्रात जाहीर सूचना दिलेली होती. असे असताना सुद्धा डुकरांचा त्रास कमी झालेला नव्हता. त्यामुळे आज रोजी नगरपालिकेने डुक्कर पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

नगरपालिकेच्या या मोहिमेत कर्नाटकातून तीन गाड्या व ३० डुक्कर पकडणारे कर्मचारी, तसेच नगरपालिकेचे ५० कर्मचारी, पोलीस स्टेशनचे चार कर्मचारी यांनी सहभाग घेतला. शहरातील पाटबंधारे कॉलनी, विद्यानगर, दत्तनगर, पोलीस स्टेशनची मागील बाजू, त्याचबरोबर सोमवार पेठ आणि जिंती नाका नदीचा परिसर यामध्ये डुक्कर पकडण्यासाठी मोहीम पार पडली. तीन गाडी भरतील इतकी डुकरे पकडण्यात आली.

सदरची मोहीम वेळोवेळी चालू ठेवण्यात येईल, याची संबंधित वराह पालन करणार्‍या मालकांनी नोंद घ्यावी व शहरात डुकरे मोकाट फिरणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!