स्थैर्य, कोळकी, दि. ६ : फलटण तालुक्यातील महत्त्वाची असणारी ग्रामपंचायती पैकी कोळकी ग्रामपंचायतीला गणले जाते. कोळकी ग्रामपंचायतीचे स्वतंत्र अस्तित्व राहण्यासाठी आगामी काळात कोळकी ग्रामपंचायतीचे रुपांतर हे कोळकी नगरपंचायती मध्ये श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. त्यासाठीच कोळकी गावाचा समावेश फलटण नगरपरिषदेच्या हद्दवाढीमध्ये करण्यात आलेला नाही. त्यासोबतच कोळकी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अथवा राजे गटाचा कसलाही पाठिंबा नाही असे हि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कोळकी ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी देत असताना तरुणांना उमेदवारी प्राधान्याने देण्याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट निर्देश दिलेले होते. तरी उमेदवारी देताना एका जागी एकाच उमेदवार देण्याचा असल्याने बर्याच जणांना उमेदवारी देता आलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी करत आपले वेगळे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटामार्फत फक्त आणि फक्त अधिकृत उमेदवारांना पाठिंबा असून कोणत्याही बंडखोर उमेदवाराला राजे गटाचा पाठिंबा नाही, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यामधील 80 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामधील काही ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाच्या वतीने बिनविरोध झाल्याचे दिसून आलेले आहे. आगामी काळामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या जात आहेत, त्या ग्रामपंचायतीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येणार आहे, असा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
कोळकी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जवळपास वीस हजार पेक्षा जास्त लोक राहत असून, कोळकी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मतदार जरी कमी असले तरी कोळकी ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये विकास करण्यासाठी व कोळकी गावचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्यासाठी कोळकी ग्रामपंचायतीचे रुपांतर हे कोळकी नगरपंचायती मध्ये करण्यात येईल. त्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण हे गांभीर्याने लक्ष घालतील, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, कोळकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोळकी गावचा विकास करण्यासाठी ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे व त्यांच्यानंतर झालेल्या बहुतांश सरपंचांनी अतिशय मेहनत घेऊन कोळकी गावचा विकास साधलेला आहे. आगामी काळामध्ये ही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला विकास साधण्यासाठी कोळकी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाचीच सत्ता आलेली पाहिजे. कोळकी ग्रामस्थही राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत राजे गटाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी देतील असा विश्वास आम्हा सर्वांना आहे.