हातगाडे रस्त्यावर सोडाल तर याद राखा, थेट जप्तीची कारवाई होणार! फलटण नगरपरिषदेचा फळ, भाजी विक्रेत्यांना सज्जड इशारा


सुपर मार्केट परिसरातील आगीच्या घटनेनंतर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; रात्रीच्या वेळी रस्त्यावर बेवारसपणे हातगाडे आणि शिल्लक माल सोडणाऱ्या फळ व भाजी विक्रेत्यांवर फलटण नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आपत्कालीन परिस्थितीत अडथळा ठरल्यास साहित्य थेट जप्त करण्याचा इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १५ फेब्रुवारी : शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये फळ, भाजीपाला आणि इतर साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी रात्रीच्या वेळी आपला शिल्लक माल आणि हातगाडे रस्त्यावरच सोडून दिल्यास आता त्यांची खैर नाही. आणीबाणीच्या परिस्थितीत या हातगाड्यांमुळे मोठा अडथळा निर्माण होत असल्याने, रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिसणारे हातगाडे थेट जप्त करण्याचा सज्जड इशारा फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी एका जाहीर सूचनेद्वारे दिला आहे.

सध्या फलटण शहरातील अनेक प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि फिरते हातगाडे धारक आपला व्यवसाय करतात. मात्र, दिवसभराचा व्यवसाय संपल्यानंतर अनेक विक्रेते आपला शिल्लक राहिलेला माल आणि हातगाडे घरी न नेता रात्रीच्या वेळी ते रस्त्यावरच किंवा रस्त्यालगत बेवारसपणे उभे करून जातात. नगरपरिषदेच्या निदर्शनास ही गंभीर बाब वारंवार आली आहे.

सुपर मार्केटमधील आगीच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग!

दोन दिवसांपूर्वी शहरातील ‘सुपर मार्केट’ अर्थात नागेश्वर मंदिराच्या परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्या आणि विक्रेत्यांच्या साहित्याला अचानक आग लागण्याची भयंकर घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. रस्त्यावर अस्ताव्यस्त सोडलेल्या हातगाड्या आणि साहित्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आणि बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण होतो, हे या पाहणीत स्पष्ट झाले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या याच पाहणीनंतर आणि त्यांनी दिलेल्या कडक निर्देशानुसारच प्रशासनाने आता हे कठोर आदेश काढले आहेत.

अडथळा ठरल्यास थेट कारवाईचा बडगा!

रात्रीच्या वेळी शहरात अचानक आग लागण्याची दुर्घटना घडल्यास किंवा कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका यांना जाण्यासाठी या बेवारस हातगाड्यांमुळे मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे बचाव कार्यात विलंब होऊन मोठी जीवित वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत नगरपरिषदेने हे कठोर पाऊल उचलले आहे. कोणत्याही फळ अथवा भाजी विक्रेत्याने आणि फिरत्या हातगाडे धारकाने आपला शिल्लक माल किंवा हातगाडा रात्रीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यालगत किंवा रस्त्यामध्ये ठेवू नये. असे निदर्शनास आल्यास तो माल आणि हातगाडा जागेवरच जप्त करण्यात येईल. या कारवाईत होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानीस संबंधित मालक किंवा विक्रेता स्वतः जबाबदार राहील, असे या ‘जाहीर सूचनेत’ स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील सर्व विक्रेत्यांनी आणि हातगाडे धारकांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!