फलटण नगरपरिषदेत स्थायी आणि विषय समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर; २६ तारखेला रंगणार ‘विशेष सभा’


फलटण नगरपरिषदेच्या स्थायी आणि ७ विषय समित्यांच्या सदस्य व सभापती निवडीसाठी २६ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन. लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रंगणार सत्तावाटपाचा खेळ.

स्थैर्य, फलटण, दि. १६ फेब्रुवारी : फलटण नगरपरिषदेच्या राजकीय आखाड्यात आता ‘सत्तावाटपाची’ मोठी रणधुमाळी उडणार आहे. नगरपरिषदेच्या विविध ७ विषय समित्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’च्या सदस्य व सभापती पदाच्या निवडीसाठी दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात एका ‘विशेष सभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ही बहुप्रतिक्षित सभा फलटणचे मुख्याधिकारी निखील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी या विशेष सभेची अधिकृत नोटीस जारी केली आहे. या सभेच्या घोषणेमुळे नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रतिष्ठेच्या समित्यांची सभापतीपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी आता नगरसेवकांची जोरदार ‘लॉबिंग’ आणि राजकीय हालचाली वेगाने झाल्या आहेत.

या महत्त्वाच्या समित्यांचे होणार गठण

नगरपरिषदेच्या नियमानुसार विषय समितीवरील सदस्यांची संख्या ७ तर स्थायी समितीची सदस्य संख्या ११ अशी निश्चित करण्यात आलेली आहे. या विशेष सभेमध्ये प्रामुख्याने खालील समित्यांचे सदस्य व सभापती निवडले जाणार आहेत:

१) सार्वजनिक बांधकाम समिती
२) शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती
३) स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती
४) पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती
५) नियोजन व विकास समिती
६) महिला व बालकल्याण समिती
७) मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती

असा आहे सभेचा अधिकृत कार्यक्रम:

या विशेष सभेमध्ये सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत स्थायी व विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन (अर्ज) दाखल केले जातील. त्यानंतर ११.३० ते १२.०० वाजेपर्यंत सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत राहील. दुपारी १२.०० ते १२.१५ या वेळेत अर्जांची माघार घेता येईल, तर १२.१५ वाजल्यापासून पुढे समितीच्या रचनेची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष असणार ‘पदसिद्ध सभापती’

मुख्याधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशात एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक बाब स्पष्ट करण्यात आली आहे. नगरपालिका अध्यक्ष (नगराध्यक्ष) हे ‘स्थायी समितीचे’ पदसिद्ध सभापती असतात, तर नगरपालिका उपनगराध्यक्ष हे ‘शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे’ पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे या दोन समित्यांच्या सभापती पदासाठी कोणतीही वेगळी निवडणूक घेतली जाणार नाही.

तसेच, ‘महिला व बाल कल्याण समिती’च्या सभापती व उपसभापती पदी केवळ महिला सदस्यांचीच निवड केली जाईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. उर्वरित विषय समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या सभेत कुणाला कोणती समिती मिळते आणि सत्तावाटपात कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होते, याकडे आता संपूर्ण फलटण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!