फलटण नगर परिषदेकडून दिव्यांग कल्याण निधीचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२४ | फलटण |
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर २०२४ रोजी फलटण नगरपरिषदेकडून फलटण शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थी यांना राखीव दिव्यांग कल्याण निधी वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिव्यांग बांधवांना संबोधित करताना प्रथमतः सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यानंतर नगरपरिषदेकडून दिव्यांग पात्र लाभार्थी यांना राखीव निधीमधून पहिल्या हप्त्याची रक्कम थेट लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याबाबत तसेच शासन स्तरावरून वेळोवेळी प्राप्त होणार्‍या सूचना व मार्गदर्शनानुसार निश्चित कार्यवाही नगरपरिषदेकडून करणेत येईल, असे सांगितले.

फलटण नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक रोहित जमदाडे यांनी नगरपरिषदमार्फत दरवर्षी राखीव दिव्यांग कल्याण निधी मधून २ टप्प्यामध्ये फलटण शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थी यांना निधी वितरित केला जात असून त्यामधील यावर्षीचा पहिला हप्ता जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून एकूण १९८ पात्र दिव्यांग लाभार्थी यांना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरुवातीला सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पात्र दिव्यांग लाभार्थी यांना निधी वितरीत केला जाणार असल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले.

या कार्यक्रमास नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी तेजस पाटील, दिव्यांग कामकाज विभागाच्या लिपिक सौ. काजल शिंदे, आस्थापना विभागाचे लिपिक संतोष घाडगे उपस्थित होते.

सूत्रसंचालन व आभार मुश्ताक महात (निवडणूक व जनगणना विभाग) यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!