फलटण: मुधोजी कॉलेजच्या NCC कॅडेट्सचे आर्मी भरतीत घवघवीत यश; २२ विद्यार्थ्यांची निवड


फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील NCC युनिटच्या २२ कॅडेट्सची २०२५ च्या भारतीय सैन्य भरतीत निवड झाली असून फलटण तालुक्याचा गौरव वाढला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 15 जानेवारी : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील NCC युनिटच्या कॅडेट्सनी २०२५ मध्ये झालेल्या भारतीय सैन्य दलाच्या भरतीत घवघवीत यश संपादन केले आहे. सातारा जिल्ह्यातून आर्मीमध्ये निवड झालेल्या युवकांपैकी फलटण तालुक्यातील ३० पेक्षा अधिक विद्यार्थी निवडले गेले असून, त्यातील तब्बल २२ कॅडेट्स मुधोजी महाविद्यालयातील NCC युनिटचे असल्याने फलटणकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

२०२५ मधील भारतीय सैन्य भरती प्रक्रियेत सातारा जिल्ह्यातून सुमारे १०० युवकांची निवड झाली. त्यामध्ये फलटण तालुक्याचा मोठा वाटा असून, मुधोजी महाविद्यालयाच्या NCC युनिटने विशेष ठसा उमटवला आहे.

निवड झालेल्या कॅडेट्समध्ये अविष्कार कोकरे, लखन कर्णावर, साहिल जगदाळे, शुभम घोरपडे, नितीन देवकर (SUO), शुभम कोळेकर, सुदीप सरक, सुशांत जाधव, रणजीत कदम, हर्षवर्धन कांबळे, महेश टेंबरे, शिवराज लवटे, संदीप कोकरे, अनिकेत कोळेकर, विराज बोडरे, प्रणव नरुटे, सोहम जामदार, प्रतिक पवार, यश मायणे, प्रथमेश नाळे, कार्तिक थोरात आणि सिद्धांत कुंभार यांचा समावेश आहे.

सातारा जिल्हा शूरवीरांचा म्हणून ओळखला जातो. देशाला सैन्य दलात सर्वाधिक योगदान देणाऱ्या जिल्ह्यांपैकी सातारा अग्रस्थानी आहे. अलीकडेच जिल्ह्यातील जवानांनी देशासाठी बलिदान दिले असून, त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने युवकांची आर्मीमध्ये निवड होणे हा जिल्ह्याच्या शौर्यपर परंपरेचा वारसा पुढे नेणारा क्षण मानला जात आहे.

या सर्व यशस्वी कॅडेट्सचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, लेफ्टनंट प्रा. संतोष धुमाळ आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!