फलटण: नगराध्यक्ष समशेरदादा भक्तीरंगात; पंगतीत बसून घेतला महाप्रसाद


फलटणच्या दक्षिण काशीत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर भक्तीरंगात दिसले. त्यांनी महोत्सवात पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेत संतांचे आशीर्वाद घेतले.

स्थैर्य, फलटण, दि. ०२ जानेवारी : फलटण येथील ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टमध्ये आयोजित ‘पंचावतार उपहार वार्षिक महोत्सवात’ नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सहभाग घेतला. तब्बल पाच तास विविध धार्मिक कार्यक्रमांत रममान होत त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे पंगतीत खाली बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

नागपूर सद्भक्त मंडळ आणि श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषा नाईक निंबाळकर यांनी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उपस्थित राहून सर्व धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदवला. पदाचा कोणताही बडेजाव न बाळगता त्यांनी भाविकांच्या पंगतीत बसून महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी नगराध्यक्ष अक्षरशः भक्तीरंगात रंगून गेल्याचे पाहायला मिळाले.

या धार्मिक सोहळ्यात नगराध्यक्ष नाईक निंबाळकर यांनी उपस्थित साधू-संत, महंत आणि आचार्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने आचार्य बाबाजी आणि सुदामराज बाबा यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब ननावरे, जय ज्योती नागरी पतसंस्थेच्या संचालिका माधुरी ननावरे, शंभूराज बोबडे, सुमित चोरमले, अजित गायकवाड तसेच नागपूरहून आलेले भक्त मंडळ आणि संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार विश्वस्त बाळासाहेब ननावरे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!