माजी खासदार रणजितसिंह व आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार; प्रलंबित समस्यांचे अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 02 जानेवारी 2025 | फलटण | फलटण तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या प्रलंबीत शासकीय व वैयक्तिक कामांच्या निवाड्यासाठी एक अनोखा प्रसंग मिळणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित होणार्‍या या जनता दरबारात, नागरिकांच्या विविध समस्यांचे समाधान करण्यात येणार आहे.

स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील व शहर हद्दीतील सर्व प्रमुख पदाधिकारी यांना विनंती केली आहे की; ते सामान्य जनतेचे बरेच दिवसांपासून शासकीय कार्यालयात अडकलेली कामे सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न आपल्या गटातील, शहरातील, गावातील, प्रभागातील सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.

या करिता प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावातील, भागातील सर्व सामान्य नागरिकांच्या अडचणीच्या किंवा तक्रारीचे अर्ज दोन प्रतीत घेण्यासाठी मदत करून ते अर्ज आमदार साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयात (आमदार सचिन पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय, महाराजा मंगल कार्यालयाशेजारी, फलटण) 6 जानेवारी पूर्वी पोहचविण्यासाठी दक्षता घ्यावी, असे सांगितले आहे. या अर्जांना 7 जानेवारी रोजी त्या त्या शासकीय विभागांना पाठवले जातील व 10 जानेवारी रोजी ते विभाग अर्जावर उत्तरे घेऊन येतील. यामुळे नागरिकांना न्याय मिळणे सुलभ होईल.

ऐनवेळी आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, असेही सांगितले आहे. लवकरात लवकर आपल्या भागातील समस्यांचे लेखी अर्ज दोन प्रतीत कार्यालयात जमा करून सहकार्य करावे, या विनंतीसह कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबीत कामांच्या निवाड्यासाठी होणार्‍या या जनता दरबाराचे आयोजन एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रयत्नामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांचे समाधान मिळणे सुलभ होणार आहे, ज्यामुळे तालुक्यातील शासन-संस्था आणि नागरिकांमधील संबंध अधिक सुधारेल.


Back to top button
Don`t copy text!