
दैनिक स्थैर्य | दि. 22 जुलै 2025 । फलटण । गोखळी ता. फलटण येथील ज्ञानेश्वर आत्माराम गावडे याची नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
गरीब व अशिक्षित कष्टकरी शेतकरी कुटुंबातील आत्माराम गावडे यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर गावडे यांनी खडतर परिस्थितीतून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण करत २/३ पोष्ट काढल्या आणि त्यातून एक पोष्ट निश्चित करुन आपले जीवन स्थिर कसे होईल, कुटुंबात आनंद कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.
ज्ञानेश्वर गावडे यांचे प्राथमिक शिक्षण गोखळी व घुलेवस्ती येथील जिल्हा परिषद प्रा. शाळांमध्ये, माध्यमिक शिक्षण कै. संजय गांधी विद्यालय, गुणवरे व हनुमान विद्यालय, गोखळी येथून इयत्ता ११ वी/१२ वी पास, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक मधून पदवी घेऊन, कै. दादासाहेब उंडाळकर अध्यापक विद्यालय, कराड येथून डी. एड. पदवी धारण केली. तदनंतर सीईटी, टीईटी पात्रता परीक्षा उत्तीर्ण, बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक कार्यकारी अधिकारी परीक्षा दि. ११ डिसेंबर रोजी झाली निकाल एप्रिल २०२५ मध्ये लागला. यामध्ये ज्ञानेश्वर गावडे याची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाली आहे.
ज्ञानेश्वर गावडे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत आहेत. आई रत्नप्रभा गावडे, वडील आत्माराम महादेव गावडे, पोलिस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत, पोलिस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलिस उपनिरीक्षक संग्राम गावडे, मनोहर सोपान गावडे या गावातील अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे फळ आपल्याला हे यश मिळाले, ते त्यांना समर्पित करत असल्याचे ज्ञानेश्वर गावडे यांनी सांगितले.
या निवडी बद्दल गोखळी, गुणवरे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.