
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणच्या सोमवार पेठेत फटाक्यांच्या पिशवीत ठिणगी पडून अडीच वर्षांचा मुलगा ९० टक्के भाजला आहे. गंभीर जखमी चिमुकल्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. ११ नोव्हेंबर : फलटण शहरातील सोमवार पेठेत फटाके उडवत असताना एका अडीच वर्षांच्या मुलाच्या हातातील फटाक्यांच्या पिशवीत ठिणगी पडल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये हा चिमुकला तब्बल ९० टक्के भाजला असून त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दुर्घटनेचे नेमके कारण
सोमवार पेठ परिसरात राहणारा समर्थ विशाल पवार हा अडीच वर्षांचा मुलगा घरासमोर फटाके उडवताना पाहत होता. त्याच्या एका हातात फटाक्यांनी भरलेली पिशवी होती. या पिशवीत झाड, पाऊस, भुईचक्र आणि इतर फटाके होते. त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या हातात एक पेटवलेली तारकडी देण्यात आली. ही पेटलेली तारकडी चुकून फटाक्यांनी भरलेल्या पिशवीत पडल्याने पिशवीतील सर्व फटाक्यांनी अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत समर्थ सुमारे ९० टक्क्यांहून अधिक भाजला गेला.
ससून रुग्णालयात हलवले
घटना घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या समर्थला उपचारांसाठी तातडीने बारामती येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, भाजण्याचे प्रमाण अधिक असल्याने आणि तेथे पुढील उपचारांची पुरेशी सोय नसल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.





