
फलटणमध्ये राजकीय सर्वेच्या नावाखाली परजिल्ह्यातील व्यक्तींकडून नागरिकांची माहिती गोळा केली जात आहे. आपली वैयक्तिक माहिती आणि मोबाईल नंबर देऊ नका, असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०५ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेची निवडणूक पुढे गेल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या राजकीय सर्वेच्या नावाखाली काही संशयास्पद प्रकार सुरू आहेत. परजिल्ह्यातील काही व्यक्ती आणि एजन्सी शहरात फिरत असून त्या नागरिकांचे मोबाईल नंबर आणि नावे गोळा करत आहेत. मात्र, नागरिकांनी अशा कोणत्याही सर्वेमध्ये आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, अन्यथा त्याचा गैरवापर होऊ शकतो, असा सतर्कतेचा इशारा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी दिला आहे.
निवडणूक लांबणीवर, एजन्सी सक्रीय
फलटण नगरपालिकेची निवडणूक काही तांत्रिक कारणास्तव पुढे गेली आहे. या संधीचा फायदा घेत काही परजिल्ह्यातील सर्वे एजन्सीच्या टीम्स शहरात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. हे लोक मतदारांना गाठून त्यांची राजकीय मते विचारण्यासोबतच त्यांची नावे आणि मोबाईल नंबर नोंदवून घेत आहेत.
“हा सर्वे आमच्याकडून नाही”
या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी स्पष्ट केले की, “आमच्याकडून किंवा आमच्या पक्षाकडून असा कोणताही सर्वे, ज्यामध्ये नागरिकांचा खाजगी डेटा (नाव व नंबर) गोळा केला जात आहे, तो करण्यात येत नाही. नागरिकांनी आपली मते नोंदवताना ती गोपनीय ठेवावीत आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मते नोंदवावीत.”
माहितीचा गैरवापर होण्याची भीती
सर्वेच्या बहाण्याने गोळा केलेल्या मोबाईल नंबर आणि नावांचा भविष्यात दबाव टाकून राजकीय हेतूसाठी किंवा सायबर गुन्ह्यांसाठी गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा सर्वेयरला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

