दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२३ | फलटण |
ऊसतोड व वाहतुकीसाठी फलटण कारखान्याने दिलेल्या १८ लाख रुपयांच्या पैशाची दुसर्या कारखान्याला ऊस घालून तिघांनी फसवणूक केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिलकुमार पांडुरंग तावरे (वय ४२, राहणार फलटण) यांनी फिर्याद दिली असून आप्पा शिवाजी मसुगडे (रा. धर्मपुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर), वैशाली सोमनाथ मदने व सोमनाथ दादाराव मदने (दोन्ही राहणार झारगडवाडी, बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फलटण साखर कारखान्याला ऊस तोडणी व वाहतूक करणेसाठी नोटरी दिनांक ०७/०३/२०२२ रोजी करून दिनांक २०/१०/२०२२ रोजी ऊस तोडणी व वाहतूक करणेकामी येणेकरिता दिनांक १६/०६/२०२२ रोजी पहिला हप्ता दिनांक २४/०८/२२ रोजी दुसरा हप्ता व दिनांक २९/०९/२२ रोजी तिसरा हप्ता असे तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी ६,००,०००-/(सहा लाख रुपये) प्रमाणे एकूण १८,००,०००-/(अठरा लाख रुपये) आरोपी आप्पा शिवाजी मसुगडे (राहणार धर्मपुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर), वैशाली सोमनाथ मदने व सोमनाथ दादाराम मदने (दोघेही राहणार झारगडवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे) यांना दिले होते. वरील आरोपींनी माझा विश्वास संपादन करून कारखान्याने दिलेल्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून इतर कारखान्यांना ऊस वाहतूक करून आमच्या कारखान्याची आर्थिक फसवणूक केलेली आहे, तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तावरे यांनी दिली आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत करत आहेत.